सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. इंडियन आयडलच्या आगामी भागात स्पर्धकांचा जोश वाढवण्यासाठी अजय देवगण आणि काजोल ही सुपरहिट जोडी या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. ते आपल्या तान्हाजी या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत.
इंडियन आयडलच्या या आगामी भागाचे नुकतेच चित्रीकरण झाले. यावेळी रॉकस्टार ऋषभ चतुर्वेदीने ‘तूने मुझे पहचाना नहीं’ आणि ‘सूरज हुआ मद्धम’ ही गाणी सादर केली. त्याची ही गाणी ऐकून परीक्षकांपासून ते अजय आणि काजोल या अतिथी परीक्षकांपर्यंत सर्वच जण मंत्रमुग्ध झाले. जेव्हा अजय देवगणने ऋषभला त्याच्या हातावरील मेहंदीच्या मागचे रहस्य विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, तो आलिया भट्टचा मोठा फॅन आहे आणि त्याने तिच्या नावाने मेहंदी लावली आहे. त्याने हेही सांगितले की, त्याने आलियासाठी एक गीत लिहिले आहे, जे विशाल दादलानीने तिला ऐकवले आणि तिलाही ते खूप आवडले आहे. त्यावर अजयने विशालला सुचवले की, ऋषभला खुद्द आलियासमोर गीत सादर करण्याची संधी द्यावी आणि मग तिची प्रतिक्रिया काय आहे, ते बघावे.”
काजोल म्हणाली, “रोमॅंटिक गाणी म्हणणे खूप अवघड असते. कारण अशा गाण्यांसाठी तुमच्यात तो हळुवारपणा आणि अचूक अभिव्यक्ती असावी लागते आणि मी ठामपणे हे सांगू शकते की, तुझ्यात एक उत्तम रोमॅंटिक गायक बनण्याचे सर्व गुण आहेत.”
हिमेश रेशमिया ऋषभचे कौतुक करताना म्हणाला, “आज तू ज्या प्रकारे गीत म्हटलेस, ते अफलातून होते. तू म्हटलेली दोन्हीही गाणी एकापेक्षा एक आहेत आणि तू ती उत्तम प्रकारे सादर केलीस.”