उमेश कामत (Umesh kamat) आणि मुक्ता बर्वे (Mukta barve) यांच्या जादुई अभिनयाने सजलेली ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsat Ahe ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आणि आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलीये. कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात असणारे आणि मधल्या काळात एकमेकांपासून दुरावलेल्या आदिराज आणि मीराच्या या कथेत आता एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.आदी व मीराचं लग्न व्हावं, ही चाहत्यांची इच्छा. पण आता या दोघांच्या मध्ये निखिल आला आहे आणि त्याने चक्क मीराला लग्नासाठी मागणी घातलीये. मीरा आदीला विसरून निखिलशी लग्न करणार का? असा प्रश्न असताना आता या मालिकेचा प्रोमो पाहून चाहतेही संभ्रमात पडले आहेत.
सोनी मराठी वाहिनीने इन्स्टावर मालिकेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये निखिल मीराला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. ‘आपल्या नात्याला एक छान आणि वेगळे नाव देऊ या..माझ्याशी लग्न करशील का ?, असं निखिल विचारतो आणि त्याच्या या प्रश्नावर मीराच्या चेह-यावर हासू उमटतं. नेमक्या त्याचवेळी आदिराज त्या ठिकाणी येतो. यावेळी त्याच्या चेह-यावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. हा प्रोमो बघता, निखिलच्या प्रपोजलला मीरा होकार देणार का? असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावतो आहे.
प्रेक्षक म्हणाले, ये नहीं हो सकता...
‘अजूनही बरसात आहे’ मालिकेच्या या प्रोमोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ये नहीं हो सकता..., असं एका चाहत्याने लिहिलं आहे. नाही़...नाही... नाही..., अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. मीरा निखिलला नक्की नकार देणार, असा विश्वास अनेक चाहत्यांनी व्यक्त केला आहे. हे स्वप्नं असू शकत आणि नसलं तरी मीरा निखिलला नकारचं देणार, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. एकंदर काय तर प्रेक्षकांची देखील मीराने या प्रपोजलला नकार द्यावा अशीच इच्छा आहे. आता मीरा काय निर्णय घेते, ते बघूच. मालिकेचा हा भाग 29 सप्टेंबरला सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेच्या निमित्तानं उमेशनं 8 वषार्नंतर टीव्हीवर पुनरागमन झालंय. 8 वर्ष सतत मालिकांमध्ये काम करण्यास नकार दिल्यावर उमेशनं ही मालिका स्वीकारली.