गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. कलर्स मराठी वाहिनीनेदेखील नवीन विषय असलेल्या काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. 'अबीर गुलाल', 'इंद्रायणी', 'दुर्गा' या अलिकडेच सुरू झालेल्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर 'पिंगा गं पोरी पिंगा', 'अशोक मामा' या नव्या मालिकांसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. पण, नव्या मालिका येत असताना कलर्स मराठीवरील 'अबीर गुलाल' ही लोकप्रिय मालिका मात्र बंद होत आहे. मालिका बंद होणं हा जसा चाहत्यांसाठी धक्का होता तसाच तो कलाकारांसाठीदेखील होता.
'अबीर गुलाल' मालिकेत अभिनता अक्षय केळकर अगस्त्य ही मुख्य भूमिका साकारत होता. काही दिवसांपूर्वीच अगस्त्यने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका बंद होत असल्याचं सांगितलं होतं. पण, अक्षयलाही काही दिवसांपूर्वीच मालिका बंद होत असल्याचं कळलं. कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय म्हणाला, "दोन दिवसांपूर्वी आम्हाला कळलं की मालिका संपतेय. माझ्याकडे दोन स्क्रिप्ट पडून आहेत किंवा तीन लाइन अप आहेत, असं मी काही सांगणार नाही. कारण, खरंच तसं काही नाहीये. दोन दिवसांपूर्वी कळलं मालिका बंद होतेय. त्यामुळे हे नक्कीच धक्कादायक होतं. पण, प्रत्येकाची बाजू आहे. आणि त्यांच्या जागी ते योग्य असतील. पहिल्या वेळी खूप वाईट वाटतं. पण, तितकं वाईट आता मला वाटत नाहीये. पण, एक गोष्ट नक्की की आता मला पुन्हा स्ट्रगल करावा लागेल. जो प्रत्येक अभिनेत्याच्या वाट्याला येतो".
अक्षयने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मराठी ४मध्ये तो सहभागी झाला होता. या शोचा तो विजेता होता. बिग बॉसमुळे अक्षय प्रसिद्धीझोतात आला होता.