घर एक मंदिर, कभी साँस भी कभी बहू थी यांसारख्या मालिकांमुळे एकेकाळी अमन वर्माला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्याने पचपन खंभे लाल दीवारे या मालिकेद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली होती. नव्वदीच्या दशकातील अनेक मालिकांमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली. 2000 च्या सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये तो मुख्य भूमिकेत दिसत होता.
त्याने इंडियन आयडल, झी सिनेस्टार यांसारख्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले आहे. खुल जा सिम सिम या त्याच्या कार्यक्रमाला तर चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तो बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकला होता. त्याने मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अमनच्या अभिनयाची त्याकाळी चांगलीच प्रशंसा केली गेली होती. अमनला त्याच्या मालिकांमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. अतिशय चांगला मुलगा, अतिशय चांगला नवरा अशा त्याच्या मालिकेतील भूमिकांमुळे त्याचे फिमेल फॅन फॉलोविंग प्रचंड होते. पण तो एका चुकीच्या कारणामुळे काही वर्षांपूर्वी चर्चेत आला होता.
अमन प्रसिद्धीझोतात असताना 2005 मध्ये त्याच्यावर कास्टिंग काऊचचा आरोप लागला होता. एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते. यात अमन एका मॉडेलकडे काम देण्याच्या बदल्यात शारीरिक संबंधाची मागणी करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. ही बातमी त्या वाहिनीने प्रक्षेपित केल्यानंतर अमनचे इंडस्ट्रीत नाव खराब झाले होते. त्यामुळे त्याला कोणीच काम द्यायला तयार नव्हते. या सगळ्या प्रकरणानंतर अमनने त्या वाहिनीवर केस दाखल केली होती. अमनचे म्हणणे होते की, या प्रकरणामुळे वाहिनीतील मंडळी त्याला ब्लॅकमेल करत आहेत आणि त्यांना अमनकडून पैसे उकळायचे आहेत. काही वर्षांनंतर हे प्रकरण शांत झाले.
अमन या प्रकरणानंतर काही वर्षांनी छोट्या पडद्यावर परतला. पण त्याला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. अमन आता त्याच्या आयुष्यात सेटल झाला असून त्याने वंदना लालवानी या अभिनेत्रीसोबत लग्न केले आहे. वंदना अमनपेक्षा 15 वर्षं छोटी असून त्यांनी एका मालिकेत एकत्र काम केले होते.