छोट्या पडद्यावर सध्या गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Khupte Tithe Gupte) याच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. तब्बल १० वर्षांनी पुन्हा सुरु झालेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी हजेरी लावत त्यांच्या हटके शैलीमध्ये फटाकेबाजी करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राजकारणापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. याच दरम्यान ते बोलत असताना त्यांनी अमित ठाकरे यांना दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjarekar) यांनी सिनेमाची ऑफर दिल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर ही ऑफर त्यांनी नाकारली हे सांगत त्या मागचं कारणही त्यांनी दिलं.
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्येच झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना (amit thackeray)महेश मांजरेकरांनी सिनेमा ऑफर केल्याचं सांगितलं.
'अमित अत्यंत गुणी आणि हँडसम असल्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून माझी त्याच्यावर नजर होती', असं अवधूत गुप्ते म्हणाला. त्यावर, "हो. महेशचीही गेली होती ना. पण पहिल्याच सिनेमाचं नाव ऐकून मी म्हटलं जरा थांब", असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर, 'कोणता सिनेमा?' असा प्रश्न अवधूतने विचारला. यावर, "एफयू...मी म्हटलं महेशला, अरे बाप बोलतो इथवर ठीक आहे. पण, पोराला कशाला आणतोस त्यात", असं मजेशीर उत्तर देत राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना आलेल्या फिल्मी प्रोजेक्टविषयी भाष्य केलं.
'द केरळ स्टोरी'ला पाठिंबा की विरोध?; राज ठाकरेंनी दिलं थेट उत्तर
दरम्यान, अमित स्वभावाने खूप साधा आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी राजकारणात अमित ठाकरे कसं त्यांचं करिअर घडवतील यावर त्यांचं मत मांडलं. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर त्यावर नेटकरी कमेंटचा पाऊस पाडत आहेत. तसंच महेश मांजरेकरांचा ‘एफयू’ (फ्रेंडशीप अनलिमिटेड) Fu Marathi Movie हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमात आकाश ठोसर, वैदेही परशुरामी,सत्या मांजरेकर, मयुरेश पेम आणि संस्कृती बालगुडे हे कलाकार झळकले आहेत.