छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती १६' (Kaun Banega Crorepati 16)मध्ये IPS अधिकारी मनोज कुमार (Manoj Kumar) आणि अत्यंत प्रतिभावान अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आपल्या 12th Fail या पुरस्कार विजेता चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या भागात उपस्थित असणार आहेत. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दीवार चित्रपटाचा किस्सा सांगितला.
या एपिसोडमध्ये IPS मनोज कुमार यांनी सांगितले की, 12th Fail चित्रपटात त्यांची कहाणी सादर करताना विक्रांत मेस्सीने जी निष्ठा दाखवली आहे, ती पाहून ते खूपच प्रभावित झाले होते. ते म्हणतात, “मी जेव्हा विक्रांतला भेटलो, तेव्हा मला त्याचे व्यक्तिमत्व खूप प्रसन्न वाटले होते. आणि त्याने मला जे सांगितले, ते ऐकून मी भावुक झालो होतो. त्याने मला सांगितले की माझी कहाणी ऐकून तो फारच भारावून गेला आहे आणि ती कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.”
सिनेमातला सांगितला विक्रांतचा किस्सा
मनोज कुमार यांनी पुढे सांगितले की, त्यांची व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी विक्रांतचा चेहरा रापलेला दिसणे गरजेचे होते. त्यासाठी त्याला तसा मेकअप करणे भाग होते, पण रंगीत मेकअप करण्याऐवजी नैसर्गिक राप दिसला पाहिजे असा आग्रह विक्रांतने धरला. “तब्बल २०-२२ दिवस विक्रांत चंबलच्या उन्हात राहिला. त्वचेवर राप चढण्यासाठी अंगावर तेल लावून तो उन्हात बसत असे.”
बिग बींनी सांगितला 'दीवार'मधला किस्सा
अमिताभ बच्चन म्हणाले की, एखादी व्यक्तिरेखा अस्सल वाटावी यासाठी अनेक अभिनेते खूप मेहनत घेतात. त्या पात्रासारखे दिसण्यासाठी ते वजन वाढवतात किंवा कमी करतात. आपल्या कारकिर्दीतील एक आठवण सांगताना ते म्हणाले, “मला दीवार चित्रपटातील एक दृश्य आठवते आहे. मला गुंडांशी हाणामारी करायची होती आणि त्यानंतर दरवाजा उघडून त्या अड्ड्यातून बाहेर पडायचे होते. आता गंमत अशी होती की, ते एक्शन दृश्य भलतीकडेच चित्रित करण्यात आले होते आणि गोडाउनचे दृश्य वेगळ्या ठिकाणी होते. या दृश्याचा शेवटचा भाग काही दिवसांनंतर मुंबई गोदीवर चित्रित करण्यात आला. जेव्हा ते दृश्य पूर्ण करण्याची वेळ आली, तेव्हा ते अगदी वास्तविक दिसावे असे मला वाटत होते. गुंडांशी हाणामारी केल्यामुळे त्या दृश्यात मी थकून अर्धामेला झालेला दिसणे गरजेचे होते. त्यामुळे, शूटिंग सुरू करण्याअगोदर मी तयार झालो आणि त्यांना थोडी वाट बघण्यास सांगितले. मी थकलेला दिसण्यासाठी त्या परिसरात मी धावत १० फेऱ्या मारल्या आणि चित्रण यथार्थ वाटेल याची खातरजमा केली. एक अभिनेता स्वतःला आपल्या व्यक्तिरेखेत आकंठ बुडवून घेत असतो.”