'बिग बॉस'च्या घरात प्रेमाची सुरुवात अन् आता साखरपुड्यामुळे चर्चेत असलेलं मराठी कपल प्रसाद जवादे (Prasad Jawade) आणि अमृता देशमुख (Amruta Deshmukh). अचानक साखरपुडा झाल्याची बातमी शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. तर आता त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. ब्लॅक थीममध्ये त्यांनी स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत ज्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात.
प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची जोडी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात जमली. बिग बॉसच्या घरात त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली जी बाहेर पडल्यावरही सुरुच होती. इतकंच नाही तर दोघांनी अगदी साध्या पद्धतीने साखरपुडाही उरकला. साखरपुड्यानंतर त्यांनी केलेले फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ब्लॅक गाऊनमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत आहे. तर प्रसादही ब्लॅक सूटमध्ये स्टायलिश दिसतोय. दरम्यान एका फोटोत प्रसाद अमृताच्या पायाशी बसलेला दिसतो. या फोटोवरुन नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच खेचली आहे.
प्रसाद आणि अमृताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रसादला 'मै जोरु का गुलाम बनके रहुँगा' म्हटलंय. तर आणखी एका युझरने दोघांना 'मराठीतले रणबीर आलिया' असं संबोधलं आहे. तर एका नेटकऱ्याला मात्र दोघांचं हे वागणं खटकलं. त्याने कमेंट करत लिहिले, 'एवढं पण एक्स्ट्रा करु नका नाहीतर सगळ्यांना आज आवडतंय आणि उद्या ट्रोल व्हाल, सिंपलच क्युट वाटता तुम्ही'.
दरम्यान, सेलिब्रिटी असून या दोघांनी अत्यंत साधेपणाने साखरपुडा केल्यामुळे सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकताच साखरपुडा केल्यानंतर ही जोडी लवकरच लग्नगाठ देखील बांधणार आहे. अमृता-प्रसादनंतर अलिकडेच स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनीही साखरपुडा केला आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहू लागल्याचं म्हटलं जात आहे.