महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श असलेली त्याची पहिली गुरु...स्वराज्याची सावली राजमाता जिजाऊ. तळपता सुर्य कुशीत वाढवण्यासाठी जणू याच तेजस्वी मातेची निवड झाली असावी . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १४ वर्षांच्या बालशिवरायांना हाताशी घेऊन पुण्याच्या उजाड होत असलेल्या जमिनीत तिने सोन्याचा नांगर फिरवला आणि शहाजीराजांसह पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं अशी 'अखंड स्वराज्याची सावली' असे जिचे वर्णन केले जाते ती राजमाता एक संवेदनशील माउली सुद्धा होती, ती कर्तव्यदक्ष पत्नी होती आणि उत्तम राज्यकर्तीही, ती धैर्यवान वीरांगना होती आणि सहिष्णु न्यायदेवताही!
इतिहासाच्या पानांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे छाप पाडणाऱ्या या १६व्या शतकातील स्त्रीशक्तीचं अष्टपैलू रूप म्हणजे जिजामाता .आपल्या गर्भातून केवळ एक कर्तृत्ववान बाळच नव्हे तर स्वराज्य जन्माला घालणाऱ्या मुलखावेगळ्या आईची गाथा ‘स्वराज्यजननी जिजामाता’ येत्या १९ ऑगस्ट पासून सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
मराठी प्रेक्षकवर्गाला इतिहासाशी जोडणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्सची ही दुसरी निर्मिती आहे. शहाजीराजांची स्वराज्य संकल्पना जोपासणाऱ्या माऊलीची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठीच 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेची निर्मिती केल्याचं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं. दरम्यान स्वराज्य जननी जिजामाता ही केवळ मालिका नसून हा एक संस्कार असल्याचं ही ते म्हणाले.