Join us

‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर स्पर्धकांना आव्हान देण्यासाठी 'एमी पुरस्कार’विजेती नृत्यदिग्दर्शिका मिया मिकेल्स उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 11:12 AM

‘डान्स इंडिया डान्स’ या लोकप्रिय नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात आजवर अनेक नामवंत नृत्यदिग्दर्शक आले असून त्यांनी या स्पर्धेतील स्पर्धकांपुढे अनेक ...

‘डान्स इंडिया डान्स’ या लोकप्रिय नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात आजवर अनेक नामवंत नृत्यदिग्दर्शक आले असून त्यांनी या स्पर्धेतील स्पर्धकांपुढे अनेक नावीन्यपूर्ण आव्हाने ठेवली. या वीकेण्डला प्रेक्षकांना एक पर्वणीच असेल कारण अनेक ‘एमी पुरस्कार’ जिंकलेली, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात नृत्यदिग्दर्शिका मिया मिकेल्स ही आव्हानवीर म्हणून येणार आहे. तिने स्पर्धकांपुढे तीन गटांतील आव्हाने ठेवली- देशी, विदेशी आणि कथा. ही आव्हाने पेलताना प्रत्येक स्पर्धकाने दाखविलेली वैशिष्ट्यपूर्ण कथाकथनाची शैली आणि सर्जनशीलतेमुळे मिया फारच प्रभावित झाली. तिने या सर्वांची नुसती प्रशंसाच केली असे नव्हे, तर त्यांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी काय करावे लागेल,याच्या टिप्सही दिल्या.अल्फोन्सने ‘सैराट झाला जी’ या मराठी गाण्यावर केलेले भन्नाट नृत्य पाहून मिया थक्क झाली. तिने त्याची तोंडभरून स्तुती तर केलीच,पणआपल्याला त्याच्यात काहीतरी सापडले आहे, असेही तिने सांगितले. ती म्हणाली की लहान असताना तिलासुध्दा हिप आणि पायांतील वैगुण्यामुळे त्रास सहन करावा लागला होता.परंतु आपल्या नृत्याच्याशिक्षणाच्या आड तिने ही गोष्ट येऊ दिली नाही. आपण नृत्याच्या क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा दृढसंकल्प केला आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तो तडीस नेला,असेही तिने सांगितले.अल्फोन्सचे बहारदार नृत्यकौशल्य पाहून खुश झाल्यामुळे तिने सांगितले, “अल्फोन्स, तू शुध्द प्रकाशाप्रमाणे आहेस. तू नृत्याच्या आड काहीही येऊ देत नसल्याने माझ्या दृष्टीने तू सुपरहिरो आहेस. तुझ्यात जग बदलण्याची ताकद असूनत्यामुळे तू नेहमी प्रगती करीत राहशील. आपल्या नृत्यात तू आपल्या पायांचा वापर पूर्ण ताकदीनिशी कर आणि आपली कथा सा-या जगापुढे मांड. माझ्या पायांतील सदोष रचनेचा मला लाभच झाला; कारण सामान्य पायांनी मला ज्या हालचाली करता आल्या नसत्या, त्या मला पाय आणि हिपच्या सदोष रचनेमुळे करता आल्या. मी अंगाने स्थूल आहे आणि अमेरिकी नृत्यक्षेत्रात ही गोष्ट दुर्मिळ समजली जाते. पण माझ्या वजनाचाही वापर माझ्या नृत्यशैलीत करून मी तिला अधिक वैशिष्ट्यपूर्ण केलं. त्यामुळे माझ्या नृत्य हालचाली अधिक जोरकस झाल्या.तुमच्याकडे जे आहे, त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर कसा करता, त्यावर तुमचं यश अवलंबून असतं.अल्फोन्स, तू योध्दा आहेस आणि त्यामुळे तू जी गोष्ट हाती घेशील, त्यात नक्कीच यशस्वी होशील.” मियाची कथा ऐकल्यावर ग्रॅण्डमास्टर मिथुनदा यांना राहावले नाही आणि ते म्हणाले, “तुझी कहाणी ऐकून मी विस्मयचकित झालो असून तुला माझा मन:पूर्वक सलाम!” या भागात नवा जोश निर्माण करण्यासाठी ‘मिनी के मास्टर ब्लास्टर्स’ संकेत आणि सारंग यांनी ‘ओ सैंय्या’या गाण्यावर नृत्य करताना मल्लखांबावरील काही अफलातून कसरती करून दाखविल्या. ‘मुदस्सर की मंडळी’तील अल्फोन्स आणि शिवम यांनी ‘सैराट झाला जी’ या गाण्यावर अफलातून नृत्य सादर केले. ‘मर्जी के मस्ताने’तील श्वेता वॉरीयरने ‘रोंडा है तेरा प्यार मुझको’ गाण्यावर सादर केलेल्या नृत्याने सर्वांना श्वास रोधून धरायला लावला.कल्पिता कचरू आणि सचिन यांनी ‘लहू मन लग गया’ या गाण्यावर केलेल्या नृत्याने सर्वजण थक्क तर झालेच,शिवाय या कार्यक्रमाची रोमँटिक सांगताही झाली.