Join us

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मध्ये रंजक वळण, नेत्राच्या हातून होणार विरोचकाचा वध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 4:19 PM

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Saatvya Mulichi Saatvi Mulgi) मालिकेत रंजक वळण आले आहे.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Saatvya Mulichi Saatvi Mulgi) मालिकेच्या कथानकातील टर्न आणि ट्विस्टमुळे रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता मालिकेत रंजक वळण आले आहे. नेत्रा व राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद कळतो तो म्हणजे नेत्रा पाच नाही तर सात महिन्यांची गरोदर आहे. नेत्राला जुळी मुलं  होणार असल्याची बातमी कळून सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही. 

राजाध्यक्ष कुटुंब विरोचकाला या जुळ्या मुलांची कुठल्याच प्रकारे माहिती न देण्याचे ठरवतात. देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे या विचाराने जल्लोषात नेत्राचं  डोहाळेजेवण साजरे होते आणि नेत्राला प्रसूतीकळा सुरु होतात. रुपालीही त्याचसाठी सज्ज झालेली असताना अद्वैत नेत्राला रुपालीच्या तावडीतून वाचवत हॉस्पिटलला घेऊन जायला निघतो. इंद्राणी व राजाध्यक्ष कुटुंब रुपालीला घरात थोपवून धरतात. अद्वैत नेत्राला हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतानाच गाडी बिघडते. उपाय म्हणून अद्वैत हातगाडीवरून नेत्राला घेऊन जात असताना त्या हातगाडीचे चाक निखळते आणि तेव्हाच नेत्राचा जीव वाचवायला एक हात येऊन ती हातगाडी धरते आणि दिसते की नेत्राला घेऊन जाणारी... अद्वैतच्या मदतीला धावून आलेली डॉक्टरचा वेश धारण केलेली त्रिनयना देवी आहे. ती त्रिनयना देवीच्या मंदिरालाच हॉस्पिटल म्हणून सांगत नेत्राला मंदिरात घेऊन जाते. 

त्रिनयना देवीच्या मंदिरात एक दिव्य  प्रकाशझोत पसरतो आणि  नेत्रा २ बाळांची आई होते. देवी तिच्या मूर्त रूपात दर्शन देत नेत्राच्या हाती कट्यार देते. तिची पूर्वसूचना मिळण्याची जी ताकद आहे ती विरोचक वधासोबतच नष्ट होईल असे सांगते. नेत्रा विरोचकाचा वध  करते. वध होताच त्रिनयना देवीवर रक्ताचा अभिषेक होतो परंतु त्या रक्ताचाच एक थेंब प्रवाही दिसतो. काय असेल या मागचं रहस्य? की आहे कोणत्या नव्या संकटाची चाहूल? हे पाहणे कमालीचे ठरेल.