Join us

'ही कोणती सिस्टिम आहे बाबा?'; मालिकेत काम करण्याच्या पद्धतीवर आनंद इंगळेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 10:24 IST

Anand ingale: आनंद इंगळे यांचा नाटक, मालिका आणि सिनेमा या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांचा सक्रीयपणे वावर आहे. त्यामुळेच त्यांनी मालिकेत काम करण्याच्या पद्धतीवर बोट ठेवलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आनंद इंगळे (anand ingale) त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळेही चर्तेत येत असतात.  नाटक, मालिका आणि सिनेमा या सगळ्या माध्यमांमध्ये त्यांचा सक्रीयपणे वावर आहे. अलिकडेच त्यांचा 'अलिबाबा आणि चाळीशीतले चोर' हा सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सध्या ते या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. अलिकडेच त्यांनी सैमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी टेलिव्हिजन विश्वाविषयी त्यांचं मत मांडलं. 

"टेलिव्हिजन हे प्रत्येक गोष्टीचं बलस्थान आहे. महाराष्ट्रात तरी छोट्या पडद्यावर  काम करणारे कलाकार हे टेलिव्हिजनमुळे घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. पण, त्याच लोकप्रियतेबरोबर एक तोच - तोपणा येतो आणि ज्या कोणत्याच घरात होत नाही अशा गोष्टी मग मालिकेत कराव्या लागतात. अलिकडच्या काळात रात्री दहा वाजता तुम्हाला उद्या सकाळी सात वाजता कॉल टाइम आहे, असं सांगितलं जातं. हे काय आहे? ही कोणती सिस्टिम आहे बाबा? नट म्हणतात हे काय आहे… मला ही पद्धत आवडत नाहीये. मग दिग्दर्शक म्हणतो, मलाही हे आवडत नाहीये. पुढे, लेखक सांगतो मलाही हे आवडत नाहीये. पण, चॅनेल सांगतंय म्हणून करतोय. चॅनेलवाल्यांना विचारलं तर, ते सांगतात आम्हालादेखील हे आवडत नाही. पण, लोकांची हीच आवड आहे. पण, लोक आम्हाला येऊन सांगतात, हे काय घाणेरडं करता तुम्ही.. बरोबर ना? अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हे आवडत नाहीये. मग हे नेमकं कोणाच्या आवडीसाठी चाललंय? ही काय पद्धत आहे?", असा सवाल आनंद इंगळे यांनी विचारला. 

पुढे ते म्हणतात, "पूर्वी टेलिव्हिजनवर ‘पिंपळपान’, ‘प्रपंच’, ‘झोका’, ‘आभाळमाया’ अशा मालिका होत्या. सुंदर, छान ज्यात खरी माणसं दाखवली जायची. हे सगळं कुठे गेलं?. मला अत्यंत खेद आहे कारण, मला असं वाटतं की टेलिव्हिजनला आता कॅमेराच अभिनय करतो. अर्धा वेळ तर वेगवेगळे शॉट दाखवले जातात. आता ती स्टाइल मागे पडली. पूर्वी जी एक शिस्त होती ना ती राहिलेली नाही. बिचारे नट-नट्या, जे आजकालचे तरूण हिरो – हिरोइन आहेत. ते लोक २५ – २५ दिवस सकाळी ९ ते रात्री १०-११ वाजेपर्यंत काम करतात. कधी कधी नाइट करतात पुन्हा सकाळच्या शिफ्टला येतात. या सगळ्या गोष्टी कोणापासून लपलेल्या नाहीत."  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेतानाटकसिनेमासेलिब्रिटी