स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील आनंदी आणि सार्थक या जोडीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. सार्थक आनंदीला पत्नी मानत असला तरी राजाध्यक्ष कुटुंबाने अद्याप तिला सून म्हणून स्वीकारलेलं नाही. मात्र आता मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. स्वत:मध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे.
सार्थकचे आनंदीवर जीवापाड प्रेम आहे. तो आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर व्यक्त करताना दिसतो. त्याच्यासारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होते, हे सांगण्याचा प्रयत्न मालिकेतून केला आहे. घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे हा विचार पटवून देणारी ही मालिका म्हणूनच प्रेक्षकांना जवळची वाटते.
मालिकेत सार्थकने जरी आनंदीला पत्नीचे हक्क दिले असले तरी राजाध्यक्ष कुटुंबाने मात्र तिला मनापासून स्वीकारलेलं नाही. सार्थकच्या आग्रहाखातर आता त्याच्या आईने आनंदीला सून म्हणून सिद्ध करण्याची एक संधी देण्याचं ठरवलं आहे. आनंदीने देखिल हे आव्हान स्वीकारले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सन्मानाने ती सासरी गृहप्रवेश करणार आहे. स्वत:मध्ये सकारात्मक बदल करत आनंदी आयुष्याची नव्याने सुरुवात करणार आहे. नव्या रुपात आणि नव्या आत्मविश्वासाने तिने स्वत:ला सिद्ध करायचं ठरवलं आहे. सार्थकच्या साथीने आनंदी हे नवं आव्हान कसं पूर्ण करणार हे मालिकेच्या पुढील भागांधून पाहायला मिळणार आहे.