आपल्या नजरेच्या टप्प्यात निळ्याशार समुद्राला सामावून घेत आलीशान क्रूझवर चित्रिकरण करण्याचा अनुभव कलाकाराला नेहमीच मिळत नाही. &TVचा भाभीजी घरपर हैं हा शो कायमच स्टोरीलाइनबाबत प्रयोगशील असताना त्यांनी आपल्या चित्रिकरण स्थळाबाबतही प्रयोग करायचे ठरवले. कलाकार आणि सहकाऱ्यांनी आपले शहरातील चित्रिकरण थांबवून त्यांच्या नेहमीच्या चित्रिकरण स्थळ तसेच मुंबईच्या उकाड्यापासून थोडे बाहेर जायचे ठरवले.
समुद्राच्या सृष्टीसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सर्व कलाकार गोव्याच्या किनारपट्टीकडे ४ दिवसांच्या चित्रिकऱणासाठी निघाले आहेत. तिथे आलीशान जलेश क्रूझ लायनरवर ते आपले सीन चित्रित करतील. दिमाखदार सनडाऊनरच्या चित्रिकरणापासून ते साहसी चित्रिकरण आणि क्रूझचा आनंद घेण्यापर्यंत हा शो आपल्या प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर गोष्ट आणणार आहे.
अत्यंत सुंदर दिसणाऱ्या सूर्यास्तावेळी चुलबुली अंगूरी भाभी आणि सरळसाधे तिवारीजी आपल्या टायटॅनिक क्षणाचा आनंद घेणार आहेत. त्यांच्या प्रेमात आणखी भर टाकण्यासाठी तसेच अम्माजींच्या सूचनांचे पालन करत असताना हे जोडपे आपल्या लग्नातही थोडी मजा आणेल आणि विभूतीच्या अपेक्षेपलीकडे जाऊन एक चांगली बातमी आणतील.
मुंबईबाहेर चित्रिकरणासाठी अगदी प्रथमच बाहेर पडण्याबाबत उत्साहित झालेले रोहिताश्व गौर ऊर्फ तिवारी म्हणाले की, ''खरे सांगायचे तर आम्ही सर्वजण मुंबईच्या उन्हाळ्याला कंटाळलो होतो आणि क्रूझवरील ही कामाची ट्रिप अगदी योग्य वेळी आली आहे. खूप खूप काळानंतर आम्ही आमच्या स्टुडिओपासून आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतात प्रथमच क्रूझवर आहोत. माझ्या सहकलाकारांसोबत क्रूझ लायनरचा आनंद घेण्याइतकी सुंदर गोष्ट असूच शकत नाही. ही क्रूझ पुढील चार दिवस आमचे घर असेल आणि क्रूझवरून आम्हाला सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेता येईल अशी आम्हाला आशा वाटते.''
आपल्या या नवीन साहसाबाबत खूप उत्साहात असलेली अंगूरी भाभी ऊर्फ शुभांगी अत्रे म्हणते की, ''मला थोडा वेळ काढून मुंबईच्या उन्हाळ्यापासून दूर जायची खूप इच्छा होती. परंतु या नवीन आणि साहसी शूट लाइनअपमुळे मी सुट्टीवर काही दिवसांनी जायचे ठरवले आहे. या नवीन बदलामुळे आम्हाला थोडा आरामही मिळेल आणि आमच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन व सुंदर आणण्याची संधी मिळेल. हा एक आकर्षक बदल आहे आणि आमच्या क्रूच्या सदस्यांसह आमच्यापैकी प्रत्येकजण या वर्ककेशनमुळे खूप आनंदात आहे. आम्ही आमच्या विनोदी दृश्यांसह काही सुंदर दृश्ये चित्रित करणार आहोत. त्यामुळे आम्हाला या क्रूझच्या आलीशानतेचा आनंदही घेता येईल अशी आशा वाटते.''