Join us

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनंतर 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून नव्या भूमिकेचा आनंद घेतेय अनिता दाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:04 IST

कलाकार म्हणून एका भूमिकेतून वा पठडीतून बाहेर पडत स्वतःला सतत तपासणं, सुधारणं आणि वैविध्यपूर्ण काम करत राहणं गरजेचं असतं. तेच सध्या अनुभवत असल्याचे अनिता दातेने म्हटले आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री अनिता दाते ही ‘राधिका’च्या भूमिकेद्वारे महाराष्ट्रातील तमाम घराघरात पोहोचली. गृहिणी आणि वर्किंग वूमन असे दोन्ही पैलू असलेल्या या तिच्या  भूमिकेला प्रेक्षकांकडून दाद मिळाली. नुकतीच राधिका झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 

 

चला हवा येऊ द्या शोविषयी बोलताना अनिता दातेने सांगितले की, राधिकाच्या भूमिकेनं मला खूप काही दिलं, अफाट लोकप्रियता मिळवून दिली. अनेकींचा संघर्ष तिच्यातून व्यक्त झाला. सर्वसामान्य रसिकांना आपलीशी वाटणाऱ्या राधिकाच्या भूमिकेत गृहिणींना आपलं सुख-दुःख दिसतं आणि या निमित्तानं माझा अनेकांशी संवाद घडला. त्यामुळे राधिका माझ्या खूप जवळची आहे आणि नेहमीच राहील.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत माझ्या भूमिकेच्या वाट्याला विनोद नव्हता. सौमित्रनं केलेले विनोदही न कळणारी, फारशी विनोदबुद्धी नसणारी अशी ती दाखवली होती. सेटवर इतरांच्या तुलनेत तसे विनोदी प्रसंग नव्हतेच त्यामुळे आता इथं मनापासून या नव्या भूमिकेचा आनंद घेतेय.

कलाकार म्हणून एका भूमिकेतून वा पठडीतून बाहेर पडत स्वतःला सतत तपासणं, सुधारणं आणि वैविध्यपूर्ण काम करत राहणं गरजेचं असतं. तेच सध्या अनुभवत आहे.नाटकाचं प्रशिक्षण घेतलं आणि खूप वर्षं नाटक केलं. ते मिस करतेय किंवा लवकरच नाटकात दिसेन या बोलण्याला सध्या तरी अर्थ नाही. परिस्थिती पूर्ववत होऊन निर्माते पुन्हा उभे राहतील त्यानंतरच हे शक्य असल्याची जाणीव आहे. तोपर्यंत आहे ती परिस्थिती स्वीकारणं गरजेचं आहे.

टॅग्स :अनिता दातेचला हवा येऊ द्या