Join us

‘मनमोहिनी’साठी अंकित सिवाच शिकला तलवारबाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 3:01 PM

माझ्या आयुष्यात त्यावेळी प्रथमच मी एक तलवार हाती घेतली होती आणि ती चालविण्याचा अनुभव फारच अप्रतिम असल्याचे अंकितने सांगितले.

यशासाठी कामाबद्दल कटिबध्दता आणि समर्पणवृत्ती अतिशय महत्त्वाच्या असतात आणि अभिनेता अंकित सिवाचचा परिपूर्णतेवर नेहमीच कटाक्ष असतो. आता ‘झी टीव्ही’वरील ‘मनमोहिनी’ या आगामी मालिकेत लंडनस्थित तडफदार उद्योगपती राम आणि 500 वर्षांपूर्वीचा राजस्थानातील एक राजा राणा सा या दुहेरी भूमिका एकाच वेळी साकारून प्रेक्षकांची मने काबीज करण्यास अंकित सज्ज झाला आहे.

या मालिकेचे कथानक जसे पुढे जात राहाणार, तसे प्रेक्षकांना जाणवेल की मोहिनी (रेहना पंडित) ही आपला प्रियकर राणा सा याचे तब्बल 500 वर्षांनंतर झालेले पुनरागमन साजरे करणार असून त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ती शक्य ते सर्व मार्ग अवलंबिणार आहे. दुसरीकडे, रामला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणारी देवकी दाई (वंदना पाठक) ही रामचे मोहिनीपासून रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. त्याला स्वसंरक्षासाठी ती चक्क तलवारबाजीचे प्रशिक्षणही देते.

राजवंशी व्यक्तीची भूमिका उभी करणे ही तशी सोपी बाब नसून त्यसाठी खूप पूर्वतयारी करावी लागते. राम आणि राणा या दोन्ही भिन्न भूमिका सहजतेने साकारण्यासाठी अंकित खूप मेहनत घेत असून अलीकडेच तलवारबाजीच्या एका प्रसंगाचा तो सराव करीत होता. आपल्या या अनुभवाविषयी अंकित म्हणाला, “राणासाच्या भूमिकेत मला एखाद्या राजपुत्राप्रमाणे वागावं लागत असून त्याचाच एक भाग म्हणजे मला अलीकडेच तलवारबाजीचा एक प्रसंग चित्रत करावा लागणार होता. माझ्या आयुष्यात त्यावेळी प्रथमच मी एक तलवार हाती घेतली होती आणि ती चालविण्याचा अनुभव फारच अप्रतिम होता.

हा प्रसंग चित्रीत करणं माझ्यासाठी काहीसं कठीण होतं; कारण राजपुतान्यतील तलवारबाजी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी तर अगदीच नवखा होतो. ती तलवार जड होती आणि ती फिरवताना मला अडचणी येत होत्या. पण योग्य प्रकारे तलवारबाजी करण्यासाठी मी तासन् तास सराव केला आणि तलवारबाजी खरी वाटावी, याचं प्रशिक्षण घेतलं. या मेहनतीचा लाभ झाला आहे, असं मला वाटतं.”