'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) ची काल धमाकेदार सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वात घरात तीन विभाग झाले आहेत. दिल, दिमाग आणि दम अशा तीन भागात स्पर्धक राहणार आहेत. शिवाय शोमध्ये काही कपल आणि बाकी सिंगल लोकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान या पर्वाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vikas Jain) असणार आहेत. त्यांनीही काल घरात प्रवेश केलाय.
अंकिता लोखंडेबिग बॉसमध्ये येणार हे समजल्यापासूनच अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. अंकिता शोमध्ये तब्बल २०० कपडे घेऊन जाणार असल्याचंही समोर आलं. आणि ते खरंही आहे. अंकिताच्या इन्स्टाग्रामवरुन तिने एक व्हिडिओ अपलोड केलाय. यामध्ये ती आणि विकी जैन घाईगडबडीत बॅग भरताना दिसत आहेत. याची झलक तिच्या या व्हिडिओमधून दिसते.
काल बिग बॉस १७ च्या ग्रँड प्रिमियरला अंकिता लोखंडे आणि विकास जैन या कपलने डान्स परफॉर्मन्स दिला. नंतर सलमान खाननेही अंकिताला तू घरात २०० कपडे घेऊन जात असल्यावरुन चिडवलं. तेव्हा सगळेच घेऊन येत असतील ना असं तिने उत्तर दिलं.
'पवित्रा रिश्ता' मालिकेतून अंकिता प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळवून दिली. अंकिता कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटातही झळकली होती. आता पती विकी जैनसह बिग बॉसमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ती सज्ज झाली आहे.