'पवित्रा रिश्ता'मधून प्रसिद्धीझोतात आलेली अंकिता लोखंडे 'बिग बॉस'मुळे चर्चेत आली होती. यंदाच्या 'बिग बॉस'मधील अंकिता चर्चेतील चेहरा होती. पती विकी जैनबरोबर तिने सहभाग घेतला होता. अंकिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. पण, सध्या तिच्या चाहत्यांना चिंतेत पाडणारी गोष्ट घडली आहे. अंकिताला दुखापत झाली असून सध्या ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. हॉस्पिटलमधला फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये अंकिता पती विकी जैनसह हॉस्पिटलमधील रुममध्ये दिसत आहेत. अंकिताच्या हाताला दुखापत झाली असून तिच्या हाताला फ्रॅक्चर असल्याचं फोटोत दिसत आहे. अंकिताला नक्की दुखापत कशी झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती अभिनेत्रीने दिलेली नाही. या फोटोला तिने "चांगले असताना आणि आजारी असानाही आम्ही एकत्र", असं कॅप्शन दिलं आहे. अंकिताचा हा हॉस्पिटलमधील फोटो पाहून तिचे चाहते चिंतेत आहेत. या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी अंकिताला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.
'बिग बॉस'नंतर अंकिता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने रणदीप हुड्डाबरोबर स्क्रीन शेअर केली होती. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांच्या पत्नीची भूमिका अंकिताने साकारली होती. अंकिता 'मणिकर्णिका' या सिनेमातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.