'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput). या जोडीची ऑनस्क्रीन प्रमाणेच ऑफस्क्रीन जोडी सुद्धा प्रचंड गाजली. त्यांचं अफेअर आणि ब्रेकअप याच्या चर्चा तर आजही चाहत्यांमध्ये रंगतात. सध्या अंकिता बिग बॉस १७मध्ये सहभागी झाली आहे. या शो मध्ये तिने सुशांत आणि तिच्या नात्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. यामध्येच बोलत असताना तिने सुशांत आणि तिचे फोटो तिच्या आईने कशाप्रकारे फाडले हे सांगितलं.
जवळपास ७ वर्ष अंकिता आणि सुशांतने एकमेकांना डेट केलं. पण, त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर ब्रेकअपनंतर सुद्धा सगळं काही ठीक होईल या आशेवर अंकिताने अडीच वर्ष सुशांतची वाट पाहिली, असा खुलासा तिने बिग बॉसच्या घरात केला. इतकंच नाही तर या शोमध्ये जाण्यापूर्वी तिने बीबीसी न्यूज हिंदीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिच्या आईने सुशांतसोबतचे सगळे फोटो फाडून टाकले असा खुलासा तिने केला.
"अडीच वर्ष मी त्याची वाट पाहिली. मला आशा होती की सगळं काही सुरळीत होईल. पण, एक दिवस..तो ३१ जानेवारीचा दिवस होता..माझ्या घरी आमच्या दोघांचे खूप फोटो होते. आणि, त्या दिवशी मी ठरवलं आईला सांगितलं हे सगळे फोटो काढून टाक. आयुष्यात दुसरं कोणीतरी यावं, यासाठी आधीची जागा रिकामी करायला हवी", असं अंकिताने सांगितलं.
पुढे ती म्हणते, "मी सांगितल्याप्रमाणे माझ्या आईने सगळे फोटो काढून फाडून टाकले. मी आईला सांगितलं जोपर्यंत सुशांत इथे आहे तोपर्यंत कोणीही माझ्या आयुष्यात येऊ शकणार नाही. मी फोटो काढले नाही, ते मी माझ्या आईला सांगितलं. ज्यावेळी मी माझ्या खोलीत गेले त्यावेळी आईने फोटो फाडून टाकले होते. त्या दिवशी मी खूप रडले. पण तोच आमच्या नात्याचा, वाट पाहण्याचा शेवट होता. मी त्याची खूप वाट पाहिली पण तो आलाच नाही, त्यानंतर ६ महिन्यांनी विकी माझ्या आयुष्यात आला."
दरम्यान, बिग बॉसच्या घरात अंकिताने सुशांतसोबतचं नातं कसं एका रात्रीत संपलं ते सांगितलं. तो एक दिवस अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेला. त्या यश मिळत होतं त्यामुळे लोक त्याला माझ्याविषयी बरंच काही सांगून त्याचं मत बदल होते आणि तो त्यांचं ऐकत होता, असं अंकिताने मुनावरला सांगितलं.