टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने गतवर्षी 14 डिसेंबरला बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain) लग्नगाठ बांधली. 2021 च्या ग्रॅण्ड वेडिंगपैकी हे एक लग्न होतं. साहजिकच लग्नाची जोरदार चर्चा झाली. या शाही लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण हे लग्न अंकिताने का केलं माहितीये? तर पार्टी करण्यासाठी. धक्का बसला ना पण हे खरं आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या ताज्या मुलाखतीत खुद्द अंकितानेच हा खुलासा केला.
‘मला पार्टी करायची होती म्हणून मी लग्न केलं. तुम्हाला माहित नसेल पण आम्ही तीन दिवस नुसत्या पार्ट्या करत होतो. आम्हाला फक्त पैसे उधळायचे होते,’ असं अंकिता म्हणाली. अर्थात हा झाला गमतीचा भाग. पण खरोखर या लग्नात अंकिताने धम्माल मज्जा केली होती. लग्नाच्या धांदलीत अंकिताच्या पायाला दुखापत झाली होती, पण तरीही ती धम्माल नाचली. त्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतीलच.
लग्नानंतर आयुष्यात काय बदल झालेत? असं विचारलं असता ती म्हणाली, ‘लग्नानंतर आयुष्य बदलतं, असं लोकांना का वाटतं माहित नाही़ लोक लग्नाकडे कशा पद्धतीने बघतात, यावर सगळं अवलंबून असतं. अनेक लोक लग्न निभवणं ही जबाबदारी समजून गंभीर होतात. माझ्यासाठी लग्न हा फक्त आनंद आहे. आम्ही दोघंही आनंदी आहोत आणि माझ्यासाठी हा आनंद महत्त्वाचा आहे. मी आणि विकी आम्ही दोघंही चिल्ड आऊट पर्सन आहोत. त्यामुळे लग्नानंतर आमच्या आयुष्यात काहीही बदलेलं नाही. गेल्या काही वर्षात विकी माझी सपोर्ट सिस्टिम बनला आहे. त्याच्यासारखा जोडीदार मिळाला, हे मी माझं भाग्य समजते.
अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.
सध्या विकी हा बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याची ही कंपनी कोल ट्रेडिंग, वॉशरी, लॉजेस्टिक, पॉवरप्लान्ट, रिअल इस्टेट व डायमंडचा व्यवसाय करते. रिपोर्टनुसार, बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचा फर्निचरचं शोरूमपासून डेंटल इन्स्टिट्यूटपर्यंत अनेक क्षेत्रात मोठा दबदबा आहे. शिक्षण क्षेत्रातही जैन कुटुंबानं मोठा पैसा लावला आहे. विकीचे वडील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकीएक आहेत. शिवाय एका प्री-स्कूलमध्येही त्यांची गुंतवणूक असल्याचं कळतं. नवीन पिढीतील विकी आता क्रीडा क्षेत्रातही उतरला आहे. तो बॉक्स क्रिकेट लीग संघ, मुंबई टायगर्सचा सहमालक आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीपासून सध्या तो दूर आहे. पण येत्या काळात या इंडस्ट्रीतही त्यानं पैसा ओतला तर आश्चर्य वाटायला नको.