कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी फेम सोशल इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी (Kunal Bhagat) लग्नगाठ बांधली. कोकणात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आता अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी पाडव्याच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिलीये.
अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत या जोडप्याने नुकतीच 'News18 लोकमत'ला मुलाखत दिली. यावेळी मुलाखतीमध्ये सध्याच्या तरूण पिढी समोरचा प्रश्न म्हणजे आधी लग्न की आधी करिअर ? यावर तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत अंकिताचा पती कुणाल म्हणाला, "दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत. मला असं वाटतं की करिअरकडे लक्ष दिलं आणि मग लग्न करायचं ठरवलं, तर असं नाही जमतं. माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे. ते सांभाळून घेणारी मुलगी असेल तर तुम्ही काहीतरी करु शकता".
तर त्याच प्रश्नावर अंकिता म्हणाली, "माझं कुणालपेक्षा थोडं वेगळं मत आहे. मला वाटतं मुलींनी लग्न करण्याआधी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं. स्वत:च्या पायावर उभं राहावं. कारण, जोडीदार हा तुम्हाला समजूतदार मिळेलच, याची खात्री नाही. अरेंज मॅरेज असेल किंवा लव्ह मॅरेज असो हातात जरी काही नसेल तर ते कठीण होईल असं मला वाटतं".
अंकिता आणि कुणाल या दोघांनीही आपल्या आपल्या क्षेत्रात नावं कमावलं आहे. तसेच 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर झळकली होती. या सीझनची अंतिम फेरी अंकितानं गाठली होती.अंकिता केवळ इन्स्टाग्रामवरच प्रसिद्ध नाही तर एक उद्योजिकादेखील आहे. तर कुणाल भगत हा प्रसिद्ध मराठी संगीत दिग्दर्शक आहे. तो गायक व लेखकही आहे. कुणालने अनेक मराठी चित्रपट व मालिकांसाठी संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे.