कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी फेम सोशल इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधली. कोकणात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी अंकिताच्या आईवडिलांनी तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिच्या आईने अंकिताचा हा पुर्नजन्म असल्याचं लोकमत फिल्मीशी बोलताना सांगितलं.
"अंकिताचा हा पुर्नजन्मच आहे. ५ वर्षांची असताना अंकिताच्या डोक्यात ताप गेला होता. डॉक्टरांनी तिची गॅरंटी दिली नव्हती. ती गेली असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण, त्यातून ती वाचली. डॉक्टरांनी सांगितलं होतं की डोक्यात ताप गेलाय तर तिच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. पण, तसं काहीच झालं नाही. त्यानंतर आम्ही तिला खूप जपलं", असं अंकिताच्या आईने सांगितलं. "लहानपणापासूनच ती हट्टी होती. जे तिला करायचंय ती तेच करायची", असंही अंकिताची आई म्हणाली.
अंकिता ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर आहे. तिचे लाखो चाहते आहेत. कोकणातील व्हिडिओमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. अंकिता बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी झाली होती. या पर्वाच्या टॉप ५ स्पर्धकांपैकी ती एक होती.