अभिनेत्री शिवानी सुर्वेची नवी मालिका 'थोडं तुझं आणि थोडं माझं' कालपासून स्टार प्रवाहवर सुरु झाली आहे. मालिकेचे प्रोमो आणि टायटल सॉंगला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. अखेर काल ही नवी मालिका सुरु झाली. शिवानी या मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी टेलिव्हिजन क्षेत्रात कमबॅक करत आहे. या मालिकेचा पहिला भाग रिलीज झाल्यावर स्टार प्रवाहने इन्स्टाग्रामवर लोकांना 'पहिला भाग आवडला का?' असा प्रश्न विचारला. त्यावर मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीने प्रतिक्रिया दिली आहे.
शिवानीची नवी मालिका अंकुश काय म्हणाला
शिवानी सुर्वेची नवी मालिका पाहून अंकुश चौधरीने दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेतेय. अंकुशने स्टार प्रवाहच्या पोस्टवर कमेंटच्या माध्यमातून त्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेचा पहिला भाग पाहून एकदम कडक असं अंकुश म्हणाला. अंकुशने दिलेल्या प्रतिक्रियेवर शिवानी आणि समीरने त्याचे आभार मानले. अशाप्रकारे बहुचर्चित 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका सुरु होताच लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेविषयी...
तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा शिवानी सुर्वे 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत काम करण्यासाठी सज्ज आहे. स्टार प्रवाहवरील शिवानीच्या 'देवयानी' मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. हेच प्रेम या नव्या मालिकेला प्रेक्षक देतील, अशी शिवानीला आशा आहे. या नव्या मालिकेत शिवानी मानसी ही भूमिका साकारत आहे. शिवानीसोबत मालिकेत मानसी कुलकर्णी, समीर परांजपे हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत. 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिका सोमवार ते शनिवार स्टार प्रवाहवर रात्री ९ वाजता बघायला मिळेल.