Join us

अंकुश चौधरीचा नवा अंदाज चर्चेत, बनला अग्निशमन अधिकारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 18:24 IST

Ankush Chaudhary : ‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या धमाकेदार डान्स रिऍलिटी शोमध्ये अंकुश पुन्हा एकदा सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. सध्या अंकुशचा अग्निशमन अधिकाऱ्याच्या रुपातला अंदाज सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. अंकुशचा हा नवा अंदाज कोणत्या सिनेमासाठी नसून स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमासाठी आहे. अंगात नृत्याची आग असणाऱ्या ४ ते १४ वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट सिद्ध करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी हक्काचा मंच उपलब्ध करुन देणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या धमाकेदार डान्स रिऍलिटी शोमध्ये अंकुश पुन्हा एकदा सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे.

या ग्रॅण्ड रिअलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा प्रोमो खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलाय. एका वेगळ्या अंदाजात मला प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली. प्रोमोमागचा विचार मला खूपच आवडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली बच्चेकंपनी आपल्या टॅलेण्टने मंचावर आग लावणार आहे. त्यामुळेच प्रोमोमध्ये मी अग्निशमन दलाच्या अधिकाराऱ्याच्या रुपात आहे. या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धकांसोबतच जजेसही परफॉर्म करणार आहेत. त्यामुळे शूटिंगला मी एक नवी स्टेप शिकण्याचं ठरवलं आहे.

तो पुढे म्हणाला की, डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा १८ फेब्रुवारीपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’
टॅग्स :अंकुश चौधरी