Join us  

गौरव मोरेनंतर समीर चौघुले सोडणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'? सोशल मीडियावर अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 5:22 PM

'हास्यजत्रा' गाजवल्यानंतर समीर चौघुले त्यांचा नवीन शो भेटीला आणत आहेत. त्यामुळे समीर यांच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय (maharashtrachi hasyajatra, samir choughule)

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे समीर चौघुले. समीर चौघुलेंनी हास्यजत्रेच्या मंचावर साकारलेली 'लोचन मजनू', 'चार्ली चॅप्लिन', 'नवरा-बायकोत भांडण लावणारा मित्र', 'शिवालीचा मॅड बाप' अशी अनेक कॅरेक्टर्स प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहेत. समीर चौघुले आता महाराष्ट्राची हास्यजत्रा गाजवून स्वतःचा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. या शोचं नाव आहे 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या'.

समीर चौघुलेंनी केली नवीन शोची घोषणा

समीर चौघुलेंनी नुकतीच सोशल मीडियावर त्यांच्या नव्या शोची जाहीर घोषणा केलीय. 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' असं या शोचं नाव आहे. समीर चौघुलेंनी या शोचं पोस्टर शेअर करुन लिहिलंय की, “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” ...समीर चौघुले ” ……. प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असत, जे संधीच सोनं करतात त्याना संसाराची विंडोसीट मिळते.. तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे नेहेमी पायदळी तुडवलं जातं....तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे “एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस”

समीर चौघुले पोस्टमध्ये पुढे लिहितात, "लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय “साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणे”...काही जणांच्या मते लग्न म्हणजे “मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’ मध्ये उडी मारणे” .....वगैरे वगैरे....‘प्रेम’ आणि ‘लग्न’ यांच्या जगभरात वगवेगळ्या व्याख्या आहेत.... रसिक हो...यातली नेमकी तुमची व्याख्या कोणती? सांगता येईल?...चला जाणून घेऊया...."

समीर चौघुले 'हास्यजत्रा' सोडणार?

समीर चौघुले शेवटी लिहितात, "आयुष्यात सुखी होण्यासाठी गुदगुल्या करणाऱ्या, मजेशीर, हास्य कल्लोळ उसळवणाऱ्या महत्वाच्या टिप्स घेऊन येतायत सदाबहार युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध अभिनेता लेखक समीर चौघुले..एक नवा कोराकरकरीत एकपात्री कथा कथनाचा कार्यक्रम घेऊन “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”......... हसतखेळत गुदगुल्या करत आपल्याला आपलाच आरसा दाखवणाऱ्या धम्माल विनोदांची भेळ म्हणजेचं........ “सम्या सम्या मैफिलीत माझ्या”....सम्याच्या मैफिलीत तुमचं स्वागत आहे..." अशाप्रकारे समीर यांनी पोस्टर आणि पोस्ट शेअर करत खास बातमी सर्वांना सांगितली आहे. या नवीन शोमुळे समीर चौघुले महाराष्ट्राची हास्यजत्रामधून Exit घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठीमराठी अभिनेतापु. ल. देशपांडे