Join us

'मन उडू उडू झालं' मालिकेतील आणखी एका कलाकारानं घेतला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 14:25 IST

Man Udu Udu Jhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेतून काही दिवसांपूर्वीच कानविंदे कुटूंबाने या मालिकेतून निरोप घेतलेला पाहायला मिळाला. त्यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने मालिकेला निरोप दिला आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मन उडू उडू झालं(Man Udu Udu Jhala)ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंद्रावर प्रचंड प्रेम असूनही केवळ बाबांच्या तत्वांना तडा जाऊ नये म्हणून दिपू आजवर प्रत्येक गोष्ट सहन करत राहिली. आता इंद्रा सरळमार्गी काम करताना पाहून दिपूचे बाबा म्हणजेच देशपांडे सर त्यांच्या लग्नाला होकार देत आहेत. मालिकेत लवकरच दिपू आणि इंद्राची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. लग्नाची लगबग आणि खरेदी या सर्व गोंधळात दिपू आणि इंद्राची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. काही दिवसांपूर्वीच कानविंदे कुटूंबाने या मालिकेतून निरोप घेतलेला पाहायला मिळाला. त्यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने मालिकेला निरोप दिला आहे. त्यामुळे इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत खूप भावुक झालेला पाहायला मिळाला. 

अमित परब याने या मालिकेत नयन रावांची भूमिका साकारली होती. आपली नोकरी सांभाळून तो या मालिकेत शलाकाच्या नवऱ्याची भूमिका निभावताना दिसला. मात्र हा ट्रॅक संपल्याने नयन, स्नेहलता आणि विश्वासराव कानविंदे यांची मालिकेतून एक्झिट करण्यात आली. या तिघांच्या पाठोपाठ आता बँकेचे मॅनेजर सोनटक्के सर या मालिकेतून निरोप घेत आहेत. सोनटक्के सरांची भूमिका राजू बावडेकर यांनी साकारली होती. राजू बावडेकर यांनी नुकतेच मालिकेचा शेवटचा त्यांचा सीन पूर्ण करून या मालिकेला निरोप दिला आहे. यावेळी इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊतने त्यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे.

विश्वासच वाटत नाही की हा तुमचा मालिकेचा शेवटचा सीन आहे. राजू बावडेकर दादा यांच्यासारखा गोड माणूस आणि उत्तम विनोदाचे टायमिंग असणाऱ्या अभिनेत्यासोबत काम करायला मिळालं. एसपी बँक ही माझ्यासाठी कायम खास राहणार आहे. याचे सगळे श्रेय सोनटक्के सर आणि मीनाक्षी कुंटे मॅडम यांना जाते. हृतासोबत रिकव्हरी करतानाही खूप खूप मज्जा आली. असे म्हणत अजिंक्यने राजू बावडेकर यांना भावनिक निरोप दिला आहे.

टॅग्स :झी मराठीऋता दूर्गुळे