रिॲलिटी शोच्या इतिहासात एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dhyas Nava) या लाडक्या कार्यक्रमाचं यंदाचं पाचवं पर्व रसिकांच्या भेटीला आलंय. सुरेल स्पर्धक, कुशल वाद्यमेळ, अभ्यासू सूत्रधार आणि नवोदित गायकांना पैलू पाडणारे पारखी परीक्षक यांनी सजवलेली सुरेल मैफल ही जरी “सूर नवा”ची आजवरची ओळख असली तरी आता आणखी एक नवी ओळख नि नवा ध्यास घेऊन सूर नवाचा हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा पेश करणार आहे. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने उचलला आहे. संगीतमय रिॲलिटी शोच्या इतिहासातला भारतात तरी हा पहिलाच अनोखा आणि एकमेवाद्वितीय असा उपक्रम आहे.
प्रत्येक आठवड्यात “सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर आपलं गाणं उत्तमोत्तम रित्या सादर करण्याचा ध्यास घेऊन सर्वोत्तम ठरणारा त्या त्या आठवड्यातील गायक सुवर्णकट्यार मिळवण्याचा मान मिळवतो. या पर्वात सुवर्णकट्यारीचा मान मिळवणाऱ्या त्या आठवड्यातील गायकाला मराठी संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या संगीतकाराकडे सोपवले जाणार आणि त्या संगीतकाराकडून आपलं स्वतःचं नवंकोरं गाणं मिळवण्याची सुवर्णसंधी त्या गायकाला मिळणार आहे. “सूर नवा ध्यास नवा “च्या या अभिनव उपक्रमातील ही पहिलीच सुवर्णसंधी सांगलीच्या शुभम सातपुते या गुणी गायकाने मिळवली असून विचारशील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि कवी- गीतकार मिलिंद जोशी यांनी लिहिलेलं एक सुरेख नवं गाणं शुभम सातपुते याच्या नावावर नोंदवलं गेलं आहे.