क्राईम पेट्रोल या कार्यक्रमाला एकेकाळी चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. हा कार्यक्रम नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल असायचा. पण गेल्या काही महिन्यांपासून या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप सोनी करत असे. पण गेल्या वर्षी त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. अनुप गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचा भाग होता. पण या कार्यक्रमामुळे त्याला त्याच्या अभिनय कारकिर्दीकडे लक्ष देता येत नव्हते आणि त्यामुळेच त्याने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने हा कार्यक्रम सोडल्याचा या कार्यक्रमाच्या टीआरपीवर परिणाम झाला होता. पण आता अनुपच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.
क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात अनुप परतणार असून त्यानेच ही गोष्ट मीडियाला सांगितली आहे. बॉम्बे टाईम्सशी बोलताना अनुपने सांगितले की, मी क्राईम पेट्रोल मधून घेतलेल्या ब्रेकमध्ये अभिनयाकडे लक्ष केंद्रित केले. या कामात व्यग्र असल्याने एक अभिनेता म्हणून मला चांगल्या भूमिका स्वीकारता येत नव्हत्या. मी आधी एक कलाकार आहे त्यानंतरच मी एक होस्ट आहे. मी या ब्रेकमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले. मी खूपच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. मला इतक्या वेगळ्या भूमिका स्वीकारायला मिळाल्यामुळे एक कलाकार म्हणून मी प्रचंड खूश आहे. खरे तर क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात मी परतण्याचा विचार देखील केलेला नव्हता. पण माझ्यासाठी अभिनय हे सगळ्यात महत्त्वाचे असून मी ते सोडू शकत नाही ही गोष्ट या टीमच्या निर्मात्यांनी समजून घेतल्याने मी छोट्या पडद्यावर परतण्याचा निर्णय घेतला.
याविषयी पुढे बोलताना अनुप सोनीने सांगितले की, क्राईम पेट्रोल या कार्यक्रमाने मला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. पण या कार्यक्रमामुळे माझी इमेज एका अतिशय सज्जन व्यक्तीची झाली होती. त्यामुळे मला माझ्या भूमिकांसोबत कोणताही प्रयोग करता येत नव्हता. एक अभिनेता म्हणून तुम्ही सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे असे मला वाटते.