'अनुपमा' या टीव्ही शोमध्ये 'नकुल'ची भूमिका साकारणारा अभिनेता अमन माहेश्वरी हे सध्याचं एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्याने करिअरच्या प्रवासात खूप संघर्ष केला आहे. अमनला 'बडे अच्छे लगते हैं 2' आणि 'मीत: बदलेगी दुनिया की रीत' सारख्या शोमधून प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनेत्याने टेली चक्करला दिलेल्या मुलाखतीत आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल सांगितलं आहे.
तुमचे संघर्षाचे दिवस कसे होते? या प्रश्नाच्या उत्तरात अमन म्हणाला, "मला वाटतं की मी अजूनही संघर्ष करत आहे. मला मुंबईत खूप वाईट अनुभव आले. या कारणास्तव मी स्वतःला वेगळं केलं होतं. आता माझे मर्यादित मित्र आहेत. पैशांसाठी लोकांनी माझी फसवणूक केली. मी खूप निराश झालो. जेव्हा मी या शहरात नवीन होतो, तेव्हा मी Shapath या शोचा एक भाग होतो. माझा चेहरा थोडा भाजला होता. तो खूप वाईट अनुभव होता."
"कोणीतरी मला 200 रुपये दिले आणि म्हणाले जा आणि डॉक्टरांना दाखवा. माझा चेहरा भाजला होता पण मोठ्या दवाखान्यात जाण्याइतके पैसेही माझ्याकडे नव्हते. माझ्या भुवया परत यायला 3 महिने लागले. मोठ्या वर्तमानपत्रात माझा लेखही प्रसिद्ध झाला, पण निर्मात्याचं नाव मोठं असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. मला या सगळ्यात पडायचे नव्हतं. या अपघाताने मला धक्काच बसला." "मला माहीत होतं की एक दिवस परिस्थिती नक्कीच बदलेल. माझे काही मित्र मला टोमणे मारायचे की मी ऑडिशन देत राहीन, पण माझी निवड होणार नाही. पण आज माझी ऑडिशन कलाकारांना रिफरेन्स म्हणून दिली आहे. त्यामुळे परिस्थिती हळूहळू बदलते असं मला वाटतं" असं अमन माहेश्वरी य़ाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.