अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) 'अनुपमा' या मालिकेतून घराघरात पोहोचली. सध्या ती तिच्या मालिकेमुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 2013 मध्ये रुपालीने बिझनेसमन अश्विन के. वर्माशी लग्न केले, ज्यांना एक मुलगा आहे. अश्विनचे हे दुसरे लग्न होते. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता, ज्यापासून त्याला दोन मुली आहेत. त्यातील एक मुलगी ईशा वर्माने आपली सावत्र आई रुपाली गांगुलीवर अनेक आरोप केलेत. मात्र, आता रुपालीने ईशाला थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे.
ईशाकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर म्हणून रुपालीने तिला थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चारित्र्य आणि वैयक्तिक बदनाम केल्याबद्दल ५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. रुपाली गांगुलीची वकील सना रईस खान यांनी ही नोटीस पाठवली आहे. वकिलामार्फत पाठवलेल्या नोटीसमध्ये, रुपालीने तात्काळ बिनशर्त सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली आहे. तसे नाही केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
सोशल मीडियावर ईशा हिची एक जुनी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हा संपुर्ण वाद सुरू झाला. २०२० साली ईशाने एक पोस्ट शेअर करत रुपालीवर अनेक आरोप केले होते. वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. रुपालीनेच आपल्या आईवडिलांचा संसार मोडला असं ती म्हणाली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अश्विनने एक निवेदन जारी करत सर्व आरोप फेटाळले होते. पण, त्यानंतर उत्तरात ईशाने पुन्हा पोस्ट करत आणि मुलाखतीमधून रुपालीवर आणखी नवे आरोप केले. सध्या ईशा आपल्या आई आणि बहिणीसोबत न्यू जर्सीमध्ये राहते. तर अश्विन वर्मा रुपाली गांगुलीसोबत मुंबईत राहतात.