'अनुपमा' या गाजत असलेल्या हिंदी मालिकेतील मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुलीने (Rupali Ganguly) भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. सध्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. अनेक सेलिब्रिटीही राजकारणात उतरत आहे. कंगना रणौतला तर भाजपाने थेट तिकीटत दिले आहे. तर दुसरीकडे गोविंदानेही काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता अभिनेत्री रुपाली गांगुलीनेही आज दिल्लीत अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला.
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा नवी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा झाला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ती म्हणाली, "एक नागरिक म्हणून आपण यात सहभागी झालोच पाहिजे. महाकाल आणि माताराणीच्या आशीर्वादाने मी माझ्या कलेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या संपर्कात असते. विकासाचं हे महायज्ञ पाहून मलाही वाटलं की मीही यात सहभाग घेतला पाहिजे. मला विनोद तावडे यांचं मार्गदर्शन मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर मी आता पुढे चालणार आहे. देशसेवा करणार आहे. मला आशा आहे यामध्ये मी अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाईन. एक दिवस सर्वांना माझा अभिमान वाटेल असं मी काम करेन. मी जे करेन ते योग्य असेल यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. जर मी चुकले तर मला तुम्ही लोक नक्की सांगा."
रुपाली गांगूलीने काही दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला. याची पार्टी तिने काल रात्री आयोजित केली होती. यामध्ये अनेक टीव्ही तारे तारकांचा समावेश होता.अनुपमाची स्टारकास्टही सहभागी झाली होती. यानंतर आज सकाळीच ती दिल्लीत पोहोचली.