Join us  

प्रसिद्ध अभिनेत्याने अचानक सोडली 'अनुपमा' मालिका; चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:14 PM

स्टार प्लसवरील 'अनुपमा' ही एक लोकप्रिय मालिका आहे. ही टीआरपी यादीतदेखील अव्वल असणारी मालिका आहे.

स्टार प्लसवरील 'अनुपमा' ही एक लोकप्रिय मालिका आहे. ही टीआरपी यादीतदेखील अव्वल असणारी मालिका आहे.  या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. कथा दमदार आहेच पण मालिकेची स्टारकास्टही तितकीच दमदार आहे. कहाणीच्या अनुषंगाने एक एक पात्र अगदी विचारपूर्वक निवडलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा एक मोठा चाहतावर्ग आहे. आता ही मालिका एका प्रसिद्ध अभिनेत्याने अचानक सोडली आहे. 

'अनुपमा' मालिकेत अभिनेत्री रूपाली गांगुली ( Rupali Ganguly ) ही अनुपमाची भूमिका साकारते आहे. तर वनराजच्या भुमिकेमध्ये सुधांशू पांडे आहे. काव्याचं पात्र हे मदालसा शर्मा साकरातेय.  तर अनुजची भूमिका अभिनेता गौरव खन्नाने निभावली आहे. या मालिकेने आतापर्यंत टीआरपीचे सर्व विक्रम मोडले आहेत. 'अनुपमा'मध्ये वनराज शाहची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडेनं ही मालिका सोडली आहे. खुद्द सुधांशूने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सुधांशू व्हिडीओमध्ये म्हणतो, "तुम्हा सर्वांना माहितेय की मी गेल्या चार वर्षांपासून अनुपमा या मालिकेशी जोडला गेलोय. या भूमिकेमुळे मला खूप सारं प्रेम मिळालं.  तेवढीत प्रेक्षकांची नाराजीसुद्धा मिळाली. पण ती नाराजी माझ्यासाठी प्रेमच आहे. कारण जर तुम्ही माझ्यावर नाराज झाले नसता, तर मी माझं काम योग्य करतोय, असं मला वाटलंच नसतं. आज मी तुम्हाला जड अंत:करणाने हे सांगतोय की मी यापुढे अनुपमा या मालिकेत दिसणार नाही. रक्षाबंधनपासूनच मी ही मालिका सोडली आहे". 

पुढे तो म्हणतो, "मालिका सोडून इतके दिवस झाले आहेत आणि माझ्या प्रेक्षकांना असं वाटू नये की मी न सांगताच निघून गेलो, म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करतोय. आता मी या मालिकेत वनराज शाहची भूमिका साकारताना दिसणार नाही. तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. माफ करा कारण मला अचानक हा निर्णय घ्यावा लागला आहे". सुधांशू पांडेनं 'अनुपमा' मालिका सोडल्यानं त्याचे चाहते नाराज झाले आहेत. सुधांशूच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता 'अनुपमा' मालिकेत 'वनराज' चे पात्र साकारण्यासाठी कोणत्या अभिनेत्याची एन्ट्री होते, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :स्टार प्लससेलिब्रिटी