मेरे साई ही मालिका सोनी वाहिनीवर प्रक्षेपित होत असून या मालिकेत प्रेक्षकांना साईबाबांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळत आहे. अबीर सुफी या मालिकेत साईबाबांच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत आता एका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्याचा प्रवेश होणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री अपरा मेहता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिकेत दाखल होण्यास सज्ज झाल्या आहेत. अपरा मेहता यांनी आजवर एक महल हो सपनो के, सार फेरे, कर्म अपना अपना यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्यांना खरी ओळख ही क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेतील त्यांच्या सविता या भूमिकेने मिळवून दिली. आपल्या सूनेशी खाष्ट वागणारी, पण सुनेच्या आयुष्यात समस्या निर्माण झाल्यावर तिच्या पाठिशी खंबीर उभी राहाणाऱ्या सासूची भूमिका त्यांनी खूप चांगल्या प्रकारे साकारली होती. आता त्या एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत.
सोनी टीव्हीवर प्रसारित होणार्या ‘मेरे साई’ मालिकेत अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. आता या कलाकारांच्या यादीत अपरा मेहताचा देखील समावेश होणार आहे. या मालिकेत त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव शांता आत्या आहे. ही झिपरीची आत्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती पैशासाठी लोकांची लग्ने जुळवत असते.
आपण आजवर अपरा यांना खूप मेक-अप केलेल्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. पण या मालिकेतील त्यांची भूमिका खूप वेगळी आहे. आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल अपरा मेहता सांगतात, “मी पहिल्यांदाच एका महाराष्ट्रीयन महिलेची भूमिका पडद्यावर साकारते आहे. मी पहिल्यांदाच कोणत्या तरी मालिकेसाठी नऊवारी साडी नेसले आहे. मी साई बाबांची भक्त आहे आणि ही मालिका मला खूपच आवडते. जेव्हा मला या भूमिकेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मेरे साई मालिकेचे नाव ऐकूनच मी होकार देऊन टाकला. मी प्रथमच मेकअप शिवाय पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. मालिकेतील सर्व कलाकार खूप छान आहेत.