'अप्पी आमची कलेक्टर' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील अप्पी-अर्जुनची जोडी प्रेक्षकांना भावली. तर अप्पी-अर्जुनच्या छोट्या सिम्बाने त्याच्या लडीवाळ अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. अप्पी-अर्जुनला एकत्र आणण्यासाठी सिम्बा अनेक युक्त्या लढवताना मालिकेत पाहायला मिळतं. मालिकेत जसा आपल्या आईसाठी सिम्बा भावुक होतो. तसंच खऱ्या आयुष्यातही या सिम्बाला आईपासून दूर जाताना अश्रू अनावर झाले.
बालकलाकार साईराज केंद्रे 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अमोल म्हणजेच छोटा सिम्बाची भूमिका साकारत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त साईराज त्याच्या घरी गेला होता. पण, सुट्ट्या संपल्यानंतर मात्र त्याला पुन्हा मालिकेच्या शूटिंगसाठी घर सोडावं लागलं. यावेळी आईला सोडून जाताना मात्र साईराजचा पाय निघत नव्हता. आईपासून दूर जाताना साईराज रडला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये आईला टाटा करताना साईराजला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. साईराजला रडताना पाहून त्याची आईदेखील भावुक झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर मिठी मारून मायलेक रडताना दिसत आहेत. साईराज आणि त्याच्या आईचा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झाले आहेत. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यामुळे साईराज प्रसिद्धीझोतात आला. त्याचं हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. या गाण्यावरील अनेक रीलही व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी साईराजला मिळाली. आता तो या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.