छोट्या पडद्यावर सध्या 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका चांगलीच गाजत आहे. तब्बल ७ वर्षानंतर अप्पी आणि अर्जुन एकमेकांच्या समोर आले आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत काही नवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. त्यात महत्त्वाची भूमिका ठरतीये ती अमोलची. अप्पी आणि अर्जुनचा लेक ७ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. विशेष म्हणजे आईपणाचा कोणताही अनुभव पाठिशी नसतांनाही शिवानी नाईकने अमोलच्या आईची भूमिका उत्तमरित्या पार पाडत आहे. या भूमिकेविषयी तिने नुकताच तिचा अनुभव सांगितला आहे.
"अप्पीच्या प्रेग्नेंसीपासूनच आईपण आपोआप अंगात आलं होतं. माझ्या मते प्रत्येक बाईमध्ये आईपण असतंच. मालिकेत अप्पीचा पूर्ण प्रवास दाखवलाय. ती लग्नाच्या आधी कशी होती, तिचा कलेक्टर होण्याचा प्रवास, लग्नानंतरचा प्रवास आणि आता तिच्या पदरात आईपण आलं आहे. मी अप्पीचा प्रवास प्रत्येक वाटेवर अनुभवला आहे. आणि, जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ही प्रत्येक हालचालींची विशेष काळजी घेणं. त्यानंतर ही जेव्हा अप्पीच बाळ गेलं त्यावर तिचा विश्वास न बसणे, या खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही बारीक लक्ष दिले आहे, असं शिवानी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "आता ७ वर्ष नंतरही अप्पीने एकटीनेच अमोलच संगोपन केलंय, त्याला चांगले छान संस्कार दिलेत, त्याला हुशारी ही तितकीच शिकवली आहे. अप्पीची भूमिका पहिल्यापासून निभावत आहे म्हणून तिचा पूर्ण प्रवास जगायला मला खूप आवडतंय. खूप मज्जा येतेय आईपण स्क्रीनवर साकारायला."