‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) हा शो सध्या जाम चर्चेत आहे. होय, ड्रामा क्वीन अर्चना गौतमची (Archana Gautam ) नुकतीच बिग बॉसने हकालपट्टी केली. शिव ठाकरेवर हात उचलणं अर्चनाला चांगलंच महाग पडलं आणि मग काय? बिग बॉसने अर्चनाला थेट बाहेरचा रस्ता दाखवला. अर्चनाला शोमधून काढून टाकल्यापासून ती सोशल मीडियावर ट्रेंड करतेय. अर्चनाला पुन्हा घरात आणा, यासाठी तिच्या चाहत्यांनी जणू मोर्चा उघडला आहे. तिला घरात आणा, नाहीतर आम्ही शो पाहणं बंद करू म्हणत अर्चनाच्या चाहत्यांनी अख्खा सोशल मीडिया डोक्यावर घेतला आहे. अशात अर्चनाबद्दलची एक नवी अपडेट समोर येतेय.
होय, चर्चा खरी मानाल तर अर्चना पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेऊ शकते. वीकेंड का वारमध्ये अर्चनाला पुन्हा घरात पाठवलं जाऊ शकतं, असा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
एका सूत्रानुसार, अर्चना पुन्हा बिग बॉसच्या घरात परतण्यास उत्सुक आहे. निर्माते सुद्धा तिला घरात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. आता सलमानच्या हजेरीत तिची एन्ट्री होते की जशी अचानक घराबाहेर गेली, तशीच अचानक ती घरात परतते, ते बघूच.
अर्चना गौतमला पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात एंटरटेनमेंट क्वीनचा खिताब देण्यात आला होता. शोमध्ये ती सर्वाधिक एंटरटेनिंग स्पर्धक असल्याचं म्हटलं जात होतं. सलमानने सुद्धा तिचं कौतुक केलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्चना ही बिग बॉसच्या घरात सर्वांशी भांडताना दिसतेय. गेल्या काही दिवसांत शिव ठाकरे, सुम्बुल यांच्याशी तिचे जोरदार वाद झालेत.
अर्चना गौतम आपलं मॉडेलिंग आणि अॅक्टिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती मुंबईत आली. 2014 साली तिने मिस उत्तर प्रदेश चा खिताब जिंकला. त्यानंतर 2018 साली मिस बिकिनी इंडिया, मिस कुओमो इंडिया अशा स्पर्धांमध्ये तिने आपली मोहोर उमटवली. 2015 साली आलेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आलेल्या ‘हसीना पार्कर’ आणि ‘बरोटा कंपनी’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं होतं. राजकारणातही ती सक्रीय आहे.