'सैराट' सिनेमातील 'आर्ची'च्या आईचीही लागली लॉटरी, छोट्या आणि मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार जादू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 4:04 AM
सैराट सिनेमानं चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडित काढत आणि रसिकांना झिंग झिंग झिंगाट वेड लावत ...
सैराट सिनेमानं चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडित काढत आणि रसिकांना झिंग झिंग झिंगाट वेड लावत सैराट सुपरडुपर हिट ठरला. या सिनेमाची कथा, यातील कलाकारांचा अभिनय, नागराज मंजुळेचे दिग्दर्शन, गाणी, संगीत, लोकेशन्स या सगळ्याच गोष्टींनी रसिकांची मनं जिंकली. सिनेमातील आर्ची आणि परशाची जादू तर आजही रसिकांवर कायम आहे. याशिवाय सैराटची गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुंजी घालत आहेत. जवळपास दीड वर्षांनंतरही सैराटची जादू काही कमी झालेली नाही. आजही या सिनेमाचे कलाकार जिथं जातात तिथे सैराटचे डायलॉग्स आणि गाण्यांची धूम पाहायला मिळते. या सिनेमातील परशाची भूमिका साकारणारा आकाश ठोसर यानं 'एफयू' सिनेमात काम केलं. तर आर्ची फेम रिंकू राजगुरु हिने 'सैराट'च्या कन्नड वर्जन सिनेमात काम केलं. याशिवाय आर्ची आणखी एका सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. या सिनेमात परशा आणि आर्ची यांच्यासोबतच इतर कलाकारांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या. याच कलाकारांपैकी एक म्हणजे आर्चीच्या आईची भूमिका. सैराट सिनेमात आर्चीच्या आईची भूमिका भक्ती चव्हाण या अभिनेत्रीने साकारली होती. सैराटनंतर परशा, आर्ची यांचं करियर जसं पालटलं तसंच भक्ती चव्हाण यांचंही करियर बदललं आहे.सैराट सिनेमातून मोठा पडदा गाजवणा-या भक्ती चव्हाण आता छोट्या पडद्यावर आल्या आहेत. 'तू माझा सांगाती' या मालिकेतून रसिकांना त्यांचं दर्शन घडणार आहे. सैराटनंतर या सिनेमातील कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाले. अशीच काही वेगळी आणि हटके भूमिका भक्ती चव्हाण यांच्या वाट्याला आलीय. तू माझा सांगाती ही मालिका संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित आहे. या मालिकेत भक्ती चव्हाण भूमिका साकारणार आहेत. सैराट सिनेमा करताना वेगळा आनंद मिळाला आणि या सिनेमातील अनेक कलाकार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, आपलं करियर घडवत आहेत असं भक्ती चव्हाण यांनी म्हटलं आहे. तू माझा सांगाती या मालिकेच्या सेटवरही चांगलं वातावरण असून प्रत्येकजण एकमेकांना मदत करतो असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. या शिवाय सैराटनंतर भक्ती चव्हाण यांच्या वाट्याला आणखी काही सिनेमा आले आहेत.'एक मराठा लाख मराठा','तुला पण बाशिंग बांधायचय','कॉपी,वंटास' या सिनेमातही भक्ती चव्हाण यांनी भूमिका साकारली आहे.लवकरच हे सिनेमाही रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती भक्ती चव्हाण यांनी दिली आहे.