Join us

आगामी ‘राधा-कृष्ण’मध्ये अर्पित रांका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 5:07 PM

सिद्धार्थ कुमार तिवारी यांची निर्मिती असलेल्या ‘राधा-कृष्ण’ नावाच्या या मालिकेत दिग्गज कलावंतांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

सुरूवातीपासूनच पौराणिक मालिकांना रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. मालिकेप्रमाणे त्यातील  व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही लक्षात असतात. पौराणिक विषयांवरील मालिका हा टीव्ही मालिकांमधील नवा कल असून त्या प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रियही होतात. आता ‘स्टार भारत’ वाहिनीवरही भारतीय संस्कृतीतील अजरामर प्रेम कहाणीचे- राधा-कृष्णाच्या प्रेमकथेचे- भव्य सादरीकरण होणार आहे. सिद्धार्थ कुमार तिवारी यांची निर्मिती असलेल्या ‘राधा-कृष्ण’ नावाच्या या मालिकेत दिग्गज कलावंतांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

कंसाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी सुयोग्य अभिनेत्याच्या शोधात असलेल्या सिध्दार्थकुमार यांनी त्यासाठी अर्पित रांकाची निवड केली आहे. यापूर्वी ‘महाभारत’ मालिकेत अर्पितने दुर्योधनाची भूमिका साकारली होती. त्यामुळे आपल्या ‘राधा-कृष्ण’ मालिकेतील कंसाच्या भूमिकेसाठी अर्पितपेक्षा अधिक सुयोग्य अभिनेता दुसरा नसेल, याची सिद्धार्थ कुमार यांना खात्री पटली. ‘राधा-कृष्ण’ मालिकेत कंस हा खलनायकाच्या भूमिकेत असून कंस केवळ मृत्यूला घाबरतो. पण अर्पित रांका हा कंसाच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू रसिकांसमोर आणणार आहे.

‘राधा-कृष्ण’ मालिकेतील आपली भूमिका आणि सिध्दार्थकुमार तिवारी यांच्याबद्दल अर्पित म्हणाला, “स्वस्तिक प्रॉडक्शनबरोबर माझी ही दुसरी मालिका आहे. आपल्या भूमिकांमुळेच कलाकारांना नवीन ओळख मिळते, प्रसिद्धी मिळते.त्यामुळेच की काय  सिध्दार्थचे वर्णन भारतीय टीव्हीवरील बाहुबली असंही केले जाते.

आता ‘राधा-कृष्ण’ मालिकेची निर्मिती तो करीत असून ती नक्कीच अतिभव्य स्तरावर निर्मिली जाईल. त्याने जेव्हा मला या मालिकेत कंसाची भूमिका देऊ केली, तेव्हा मी त्याला नाही म्हणू शकलो नाही; कारण माझी कारकीर्द घडविण्यात त्याचा वाटा मोठा आहे. रसिक मला आजही दुर्योधन म्हणून ओळखतात; स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी लाभली. आता ते मला कंसाच्या भूमिकेतही स्वीकारतील, अशी आशा करतो.” तसेच छोट्या पडद्यावरील आगामी राधा कृष्ण पौराणिक मालिकेच्या प्रसारीत होणा-या भागाची सा-यांना प्रतीक्षा आहे.. मालिकेत घडणा-या या घटनेची उत्कंठा रसिकांमध्ये पाहायला मिळत आहे.