कॉमेडियन, अभिनेता कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishek) पत्नी कश्मिरा शाहचा (Kashmera Shah) अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये भयानक अपघात झाला. अपघातानंतर काही वेळाने तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. रक्ताचे डाग लागलेल्या टिश्यूंचा तिने फोटो टाकला. यावरुन तिला चांगलाच मार लागल्याचं दिसत आहे. पण कश्मिराचा हा अपघात नक्की कसा झाला हे तिने सांगितलं नाही. नुकतंच कश्मिराची नणंद म्हणजेच कृष्णाची बहीण आरती सिंहने (Arti Singh) याविषयी माहिती दिली.
कश्मिरा शाहचा अपघात नेमका कसा झाला आणि तिला किती लागलं असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. फोटो पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. आता आरती सिंहने ईटाइम्सशी बोलताना सांगितले, "कश्मिराची पोस्ट पाहिल्यावर आम्ही सगळेच चिंतेत होतो. मी नंतर तिच्याशी बोलले. ती आता बरी आहे. हा अपघात एका मॉलमध्ये झाला जिथे ती आरशाला धडकली. काच फुटली आणि तिच्या नाकाला जबर मार बसला. यानंतर तिला बोलताही येत नव्हतं. खूप रक्त वाहिलं. आता तिची तब्येत बरी आहे."
कृष्णा पत्नी आणि मुलांसह लॉस एंजिलिसला गेला होता. सुट्टी एन्जॉय करुन कृष्णा आणि मुलं भारतात परतली मात्र कश्मिरा तिथेच थांबली होती.
काय होती कश्मिराची पोस्ट?
कश्मिराने रक्ताने माखलेल्या टिश्यूंचा फोटो ठेवत लिहिले,"मला वाचवल्याबद्दल देवाचे आभार. भयानक अपघात होता. काहीतरी झालं असतं सुदैवाने थोडक्यात निभावलं. कोणताही डाग राहणार नाही अशी मला आशा आहे. रोज प्रत्येक क्षण जगा. लवकर भारतात पोहोचावं वाटतंय. कुटुंबाची खूप आठवण येत आहे."