‘खिचडी’च्या कलाकारांनी घेतली पंतप्रधान नरेन्द्र मोदींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 8:08 AM
तब्बल 12 वर्षांपूर्वी आपल्या नर्म विनोदी शैलीमुळे घराघरात लोकप्रिय झालेली ‘खिचडी’ ही मालिका आता लोकआग्रहास्तव नव्या स्वरूपात पुन्हा प्रसारित ...
तब्बल 12 वर्षांपूर्वी आपल्या नर्म विनोदी शैलीमुळे घराघरात लोकप्रिय झालेली ‘खिचडी’ ही मालिका आता लोकआग्रहास्तव नव्या स्वरूपात पुन्हा प्रसारित होत आहे. नव्या आवृत्तीच्या चित्रीकरमाला प्रारंभ झाल्यापासून या मालिकेत रोद काहीतरी संस्मरणीय घटना घडत असते. अगदी पंतप्रधानांची भेट घेण्यापर्यंत! यावेळी ‘खिचडी’ मालिकेच्या कलाकारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची संधी मिळाली. मोदी स्वत: ‘खिचडी’ मालिकेचे चाहते आहेत. मालिकेचे दिग्दर्शक आतिश कापडिया, निर्माते व कलाकार जे. डी. मजिथिया आणि प्रमुख कलाकार सुप्रिया पाठक यांची भेट घेतल्यावर मोदींना आपल्या चाहत्यांची भेट झाल्यासारखे वाटले. आणि त्यांनी त्यांच्याबरोबर फोटोही काढले.मोदी यांच्या भेटीमुळे उत्साहित झालेले जे. डी. मजिथिया म्हणाले, “मोदी यांनी आम्हाला पहिलाच प्रश्न विचारला, “खिचडी केवी पाकी छे?” म्हणजे यावेळी खिचडी कशी बनली आहे? आम्ही पूर्वीही त्यांची भेट घेतली होती, त्याची आठवण त्यांनी काढली आणि यावेळी पुन्हा भेट घेतल्याबद्दल त्यांनी आमचे आभार मानले. त्यांनी आम्हाला भरपूर शुभेच्छा दिल्या. कामात खूपच व्यग्र असतानाही वेळ काढून त्यांनी आमची भेट घेऊन चौकशी केल्याबद्दल मी, आतिश आणि सुप्रिया खूपच भारावून गेलो आहोत. आमच्यासाठी तो दिवस अतिशय संस्मरणीय ठरला.” ‘खिचडी : द मूव्ही’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीदरम्यान या कलाकारांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची भेट घेतल्यावर त्यांना आपला आनंद आणि उत्साह दाखविता आला.‘खिचडी’ ही एक कौटुंबिक करमणूकप्रधान मालिका असून त्यात पारेख कुटुंबियांच्या विविध उचापत्यांचे नर्म विनोदी शैलीत चित्रण केले आहे. नव्या आवृत्तीत जे. डी. मजिथिया, सुप्रिया पाठक, वंदना पाठक, अनंग देसाई आणि राजीव मेहता हे मूळ मालिकेतील कलाकार कायम ठेवण्यात आले असून काही नामवंत कलाकार पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसतील.