Join us

'आई कुठे काय करते'च्या निरोपाचे क्षण जवळ येताच अरुंधती झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 13:05 IST

Aai Kuthe Kay Karte : पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अरुंधतीचं पात्र साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर यांनी यानिमित्ताने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पाच वर्षांच्या या प्रवासात देखमुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झाली. प्रेक्षकांनी देशमुख कुटुंबातले सुखाचे क्षण आपले मानून आनंद व्यक्त केला तर संघर्षाच्या काळात काळजीरुपी साथदेखील दिली. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आज आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनामनात पोहोचली आहे. पण ज्याची सुरुवात होते त्याचा शेवटही ठरलेला असतोच. भरभरुन प्रेम मिळाल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकारांनाही मालिकेची सांगता होतेय याची हुरहुर आहे. अरुंधतीचं पात्र साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) यांनी यानिमित्ताने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

मधुराणी म्हणाली, मालिका सुरु झाली तेव्हा खरंच असं वाटलं नाही की हा प्रवास इतका मोठा आणि सुखकारक असेल. पाच वर्ष चालणाऱ्या आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालेल्या प्रोजेक्टचा आपण भाग होणार आहोत याची कल्पनाच नव्हती. ही पाच वर्ष कशी गेली खरंच कळलं नाही. महिन्याचे २० ते २२ दिवस आम्ही शूट करायचो, बराचसा वेळ हा सेटवरच जायचा. अरुंधतीला प्रत्येकासोबतच खूप जीवाभावाचे सीन्स करायला मिळाले. भूमिकेचा आलेख कसा असेल याचा मला अजिबात अंदाज नव्हता. इतके वास्तवाला भिडणारे काहीतरी आपण करणार आहोत याची कल्पनाच नव्हती. 

हे क्षण पुन्हा जगता येणार नाहीत

ती पुढे म्हणाली, मला अजूनही तो सीन आठवतो जिथे अनिरुद्ध अरुंधतीला हाताला धरुन बाहेर काढतो. तो म्हणतो की तू नको आहेस मला तुझ्या हातांना मसाल्याचा वास येतो. हे ऐकून अरुंधतीला धक्का बसतो आणि तिला पहिला पॅनिक अटॅक येतो. असा एखादा सीन मालिकेच्या सुरुवातीलाच करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते. हा आणि असे अनेक सीन कायम लक्षात रहातील. काही दिवसांनंतर हे क्षण पुन्हा जगता येणार नाहीत याची हुरहुर आहेच. अरुंधती या पात्राचे इतके वेगवेगळे पदर साकारले आहेत की खरंच सांगताना भावनाविवश व्हायला होतं. प्रेक्षक येऊन भेटतात डोळ्यात पाणी असतं. कुठेतरी स्वत:ला पहात असतात अरुंधतीमध्ये. प्रत्येक स्त्रीचा आरसा असणारं पात्र या मालिकेच्या माध्यमातून साकारायला मिळालं यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजेन. 

अरुंधती माझ्यासोबत कायम राहणार

मालिकेच्या सहकलाकारांबरोबर निर्माण झालेला बंध आणि एक चांगली भूमिका निभावल्याचं समाधान चिरकाल लक्षात राहिल. स्टार प्रवाह, डायरेक्टर कट प्रॉडक्शन हाऊस, नमिता नाडकर्णी आणि दिग्दर्शक रविंद्र करमरकर ह्याचे मनपूर्वक आभार. त्यांच्यामुळे अरुंधती इतकी लोकप्रिय आहे. प्रेक्षकांना इतकंच सांगेन की, आईला भरभरुन प्रेम दिलंत. कष्टांना उचलून धरलत. मालिका जरी संपली असली करी अरुंधती माझ्यासोबत कायम रहाणार आहे. तुमचं प्रेम आणि अरुंधतीच्या आठवणी घेऊन इथून पुढची वाटचाल करणार आहे अशी भावना मधुराणी यांनी व्यक्त केली. आई कुठे काय करते मालिकेचे निरोपाचे अंतिम भाग दुपारी २.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळेल.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिका