आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक दशके रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले या दिल है हिंदुस्तानी-2 कार्यक्रमात आपले सहगायक किशोरकुमार यांच्या काही आठवणींमुळे भावूक झाल्या. आशा भोसले आणि किशोरकुमार या दोघांनीही आपली पार्श्वगायनाची कारकीर्द एकत्रच सुरू केली होती आणि ध्वनिमुद्रकांनी या दोघांचेही “आवाज चांगले नसल्याचे” कारण देत फेटाळून लावल्यामुळे त्यांना गायनापासून काही काळ वंचित राहावे लागले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये चांगले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते आणि नंतर त्यांनी अनेक अजरामर गाणी या जोडीने दिली. यावेळी आशाताईंनी “इना मीना डिका” या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी किशोरकुमार यांच्या विचित्र आणि विनोदी वागण्यामुळे आपल्याला सारखे कसे हसू फुटत होते, त्याची आठवण सांगितली. किशोरकुमार अधुनमधून गाताना विचित्र हरकती करत असे. कधी ते चक्क आडवे पडून गाणे म्हणीत, असे आशाताईंनी सांगितले.
आशा भोसले म्हणाल्या, “किशोरकुमार हे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्वं होतं. त्यांनी आपल्या अप्रतिम आवाजात गायलेल्या गाण्यांनी रसिकांचे कान तृप्त केले तसेच आपल्या भोवती वावरणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य फुलविलं. भारतीय संगीत क्षेत्रातील ते एक लखलखता हिरा होत. त्यांच्याबरोबर काम करताना मला नेहमीच आनंद होत असे. त्यांची जागा घेणं आजच्या काळातही कोणालाही शक्य नाही.” ‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सीमा पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.