Join us  

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज, पाहा नव्या मालिकेचा प्रोमो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 9:42 AM

एका नव्या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत.

Ashok Saraf  : अशोक सराफ हे भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. त्यांना आपण मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत काम करताना पाहिलंय. इतकंच नव्हे तर वयाची ७७ वर्ष झाली तरीही अशोक सराफ कार्यरत आहेत. अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध सिनेमात अभिनय करुन लोकांचं प्रेम मिळवलंय. आता ते पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

होय, एका नव्या मालिकेच्या माध्यमातून अशोक सराफ छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेचे नावदेखील "अशोक मा.मा." असे हटके आहे. त्यामुळे मालिकेत नेमकं काय पाहायला मिळणार, अशोक सराफ यांच्याशिवाय आणखी कोणते पात्र असणार, मालिकेची कथा काय असणार, हे सर्व जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

कलर्स मराठीने नुकतंच नव्याकोऱ्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, "महाराष्ट्राचा महानायक टेलिव्हिजनवर परतला आहे. तो चुकीच्या गोष्टींना योग्य करणार, सगळ्यांना शिस्त लावणार, आणि आपल्या कमाल परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क करणार! मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे लाडके मामा लवकरच येत आहेत. पाहायला विसरू नका, नवीन गोष्ट 'अशोक मा.मा.' फक्त कलर्स मराठीवर...".

अशोक सराफ टेलिव्हिजनवर परत येताय हे कळताच प्रेक्षक तर भलतेच खूश झाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये त्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. "या कंटाळवाण्या सिरीयल पासुन सुटका मिळण्यासाठी अशोक सराफ सर तुम्ही लवकर या काहितरी नवीन नक्कीच असणार वाट बघतो आहोत",  "अशोक मामांना अशा वेगळ्या भूमिकेत बघण्याची पर्वणी मिळणार.. या वयातही हा उत्साह उल्लेखनीय आहे.. खूप काही शिकण्यासारखं आहे मामांकडून", "अशोक मामा...एकदम कडक", अशा कमेंट त्यांनी केल्या आहेत. 

 

टॅग्स :अशोक सराफकलर्स मराठीसेलिब्रिटीमराठी अभिनेता