Join us

‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर अशोक सराफ यांची खास हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 4:28 PM

स्पर्धकांचं थक्क करणारं टॅलेण्ट पाहून अशोक सराफही खुश झाले आणि त्यांनी स्पर्धकांना खास टिप्स देत प्रोत्साहन दिलं.

‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर या आठवड्यात खास हजेरी लावणार आहेत मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक अशोक सराफ.अशोक सराफ यांच्या उपस्थितीने सेटवरचं वातावरणच बदलून गेलं होतं. विनोदाच्या बादशहाची प्रत्यक्ष भेट होणं हा क्षण ‘एक टप्पा आऊट’च्या सर्व स्पर्धकांसाठी सुखावणारा होता. अशोक मामांच्या स्वागतासाठी स्पर्धकांनी जय्यत तयारी केली होती. अशोक सराफ यांच्या सुपरहिट सिनेमातले काही प्रसंग अनोख्या ढंगात सादर करत स्पर्धकांनी ‘एक टप्पा आऊट’च्या सेटवर धमाल उडवून दिली. स्पर्धकांचं थक्क करणारं टॅलेण्ट पाहून अशोक सराफही खुश झाले आणि त्यांनी स्पर्धकांना खास टिप्स देत प्रोत्साहन दिलं.

‘एक टप्पा आऊट’ची ही स्पर्धा दिवसेंदिवस चुरशीची होतेय. उत्तम सादरीकरणासोबतच एलिमिनेशनची टांगती तलवार असल्यामुळे स्पर्धकांपुढे नवं आव्हान आहे. यासाठी स्पर्धक जीवेतोड मेहनत करत आहेत. महाराष्ट्राला अनेक दिग्गज विनोदवीरांचा वारसा लाभला आहे. पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे यासारख्या दिग्गज कलावंतांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला हसवलं. हीच परंपरा अखंड जपण्याचा प्रयत्न ‘एक टप्पा आऊट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. 

या कार्यक्रमातून बऱ्याच वर्षांनंतर स्टॅण्ड अप कॉमेडीचा आनंद प्रेक्षकांना घेता येतोय आणि तेही विनोदाची जाण असणाऱ्या स्पर्धकांकडून. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि रत्नागिरी येथे पार पडलेल्या ऑडिशनमधून हे स्पर्धक निवडण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातलं टॅलेण्ट एका मंचावर आल्यामुळे प्रेक्षकांसाठी ‘एक टप्पा आऊट’ म्हणजे अनोखी पर्वणी ठरतेय. ‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर रेशमचे रापचिक राडेबाज, अभिजीतचा अवली आखाडा, विजयचे वात्रट वल्ली आणि आरतीचा अतरंगी अड्डा धमाल करायला सज्ज आहेत.

टॅग्स :अशोक सराफस्टार प्रवाह