सोनी मराठी वाहिनीवरील 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने महाराष्ट्राच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच खरंच रत्नं घडवतो आहे. सध्या महाराष्ट्राला उत्तम ६ स्पर्धक मिळाले आहेत. आता सुरांची स्पर्धा बघायला मिळते आहे अंतिम फेरीत सहभागी होण्यासाठी. यंदाच्या आठवड्यात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) येणार आहेत.
चेहर्यावरील विनोदी हावभावांच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीवर अभिनेता म्हणून जर कोणी अधिक काळ राज्य केले असेल, तर ते आहेत सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ. मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना 'अशोक मामा' म्हणून ओळखते त्यांनी फक्त विनोदी भूमिका नाहीत तर गंभीर भूमिकासुद्धा चोखपणे बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एक खट्याळ प्रियकराची भूमिका असो किंवा अगदी वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अशोक मामांच्या येण्याने सुरांच्या मंचावर उत्साह पसरणार असून स्पर्धक अशोक सराफ यांच्यावरच चित्रीत झालेली गाणी साजरी करणार आहेत. सुरांच्या मंचावर गाण्यांसोबत आठवणींना उजाळा मिळाला आहे आणि रसिकांसाठी हा भाग म्हणजे मेजवानी ठरणार आहे.
अशोक सराफ यांच्यासाठी गायलेली गाणी, त्यांनी सांगितलेले किस्से हे सगळे अनुभवण्यासाठी ४, ५ आणि ६ एप्रिलला रात्री ९ वाजता 'इंडियन आयडल मराठी' नक्की पाहा.