'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. अश्विनी मनोरंजन विश्वात सक्रीय आहेच शिवाय ती राजकीय वर्तुळात सुद्धा उत्साहाने सहभागी होताना दिसते. काही दिवसांपुर्वी वाईमध्ये शरद पवार यांची राजकीय सभा झाली. त्यावेळी अश्विनीने जोरदार भाषण केल्याचं पाहायला मिळालं. अश्विनीने काल महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात सुरु असलेल्या मतदानासाठी पसरणी गावात जाऊन मतदान केलं. मतदान केल्यानंतरचा अनुभव अश्विनीने सोशल मीडियावर शेअर केलाय.
अश्विनीने बोटाला शाई लावून सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. फोटो शेअर करुन अश्विनी लिहिते, "निमित्त होते आजच्या मतदानाचे. आम्ही आमचा हक्क बजावला.आता वातावरणच असे आहे की जो तो, ज्याला त्याला "हा अमुक पक्षाचा, हा तमुक पक्षाचा" असे मनात ठरवून मोकळा होतोय. पण या सगळ्या पलीकडे सर्वसामान्याला माणूस महत्त्वाचा आहे हेच खरे."
अश्विनी पुढे म्हणाली. "आज पसरणी मध्ये जेवढी माणसं भेटत होती ते सगळेच इतक्या प्रेमाने विचारपूस करत होते. सणासुदीला भेट होत नाही पण आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने जेवढ्या महिला भेटत होत्या त्या अगदी प्रेमाने कौतुक करत होत्या याचा आनंद वाटला. एकीकडे निवडणुकीमुळे वातावरण तसे गरमच आहे, दुसरीकडे एकंदरीतच उन्हाळा आणि या सगळ्यात माझ्या गावाच्या माता माऊलींनी अगदी चेहऱ्यावरून हात फिरवत केलेले कौतुक याने समाधान वाटले."