डॉ. अमोल कोल्हे सध्या राजकारणात सक्रीय आहेत. अमोल सध्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरुर मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत. शिरुरलोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून डॉ.अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजी आढळराव पाटील यांच्यात लढत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमोल यांनी काल अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यावर अमोल कोल्हे यांची ऑनस्क्रीन बहीण अभिनेत्री अश्विनी महांगडेने खास पोस्ट लिहिली आहे.
झी 24 तास या वृत्तवाहिनीशी बोलताना अश्विनी म्हणाली, "एक सहकलाकार म्हणून मला खूप वाईट वाटतंय की आता अमोल दादांसोबत काम नाही करता येणार, पण एक माणूस म्हणून खूप अभिमान वाटतो की त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ शिरूर मतदारसंघाला देण्याचा ठरवला आहे, शिरूर ची जनता खूप लकी आहे की त्यांना असा खासदार भेटला." अशा शब्दात अश्विनीने अमोल कोल्हेंच कौतुक केलंय."
दरम्यान झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अमोल कोल्हे यांनी निर्णय सांगितला की, "मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावायची असतील तर अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणे हे अवघड आहे. यामुळे प्राधान्य ठरवावे लागेल. मला मतदारसंघातील प्रोजेक्ट महत्वाचे आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातील लोकांची काम महत्वाची आहेत, यासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला तरी घेईन. मी ही रजा पाच वर्षांसाठी घेणार आहे." असं डॉ.अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.