Join us

'आई कुठे काय करते' मालिकेनंतर अश्विनी महांगडे दिसणार नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:48 IST

Ashwini Mahangade : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली. दरम्यान आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरीदेखील या मालिकेतील कलाकार रसिकांच्या मनात घर करून कायम आहे. या मालिकेत अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) घराघरात पोहचली. दरम्यान आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याबाबत तिनेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. 

अश्विनी महांगडे कोणत्या सिनेमात किंवा मालिकेत काम करताना दिसणार नाही. तर ती एका नाटकात काम करते आहे. या नाटकाचं नाव आहे गडगर्जना. यात ती राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत तिने फोटो शेअर करत लिहिले की, #राजमाता_जिजाऊ_माँसाहेब साकार करणे म्हणजे आयुष्याचे सोने होणे असाच अनुभव….. सादर करीत आहोत #महानाट्य #“गडगर्जना”….. रसिक मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने उभा करत आहोत इतिहास..पूर्ण टीमने घेतलेली प्रचंड मेहनत, केलेला रात्रीचा दिवस, केलेले कष्ट यांचे चीज नक्की होईल याची खात्री आहे.

गडगर्जना या नाटकाचे दिग्दर्शन वैभव अनंत महाडिक यांनी केले आहे. या नाटकात स्तवन शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता निखिल चव्हाण निवेदकाची भूमिका बजावत आहे. नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत वैभव सातपुते झळकणार आहे. नृत्यदिग्दर्शन अमित घरत यांनी केले आहे. लवकरच या नाटकाचा शुभांरभ पार पडणार आहे. अश्विनीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका