तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एक वाटू लागल्या आहेत. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत.
दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून दूर आहे.
आता प्रेक्षकांची लाडकी दया मालिकेत केव्हा परतेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दिशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावर ती मालिकेत लवकरच परत यावे असे तिच्या चाहत्यांनी कमेंटद्वारे म्हटले होते.
दिशा वाकानीला मालिकेत परत येण्यासाठी आता 30 दिवस विचार करण्यास देण्यात आला असल्याचे वृत्त स्पॉटबॉय या वेबसाईटने नुकतेच दिले होते. 30 दिवसांत दिशाने चित्रीकरण सुरू न केल्यास तिच्याऐवजी दुसऱ्या कलाकाराचा विचार करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. त्यानंतर या मालिकेत दिशाच्या भावाच्या भूमिकेत असलेला सुंदर म्हणजेच मयुर वाकानी ही मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात होते. पण या सगळ्यावर आता या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
त्यांनी याविषयी मीडियाला सांगितले आहे की, दिशाला सुरुवातीपासूनच आम्ही सहाय्य केले आहे. तिला तिच्या मुलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळावा यासाठी आम्ही तिला परत येण्याविषयी विचारले देखील नव्हते. पण आता अनेक दिवस झाले आहेत. दयाने गोकुळधाम सोसायटीत परत येणे आता गरजेचे आहे. त्यामुळे आता दिशा तिच्या वैयक्तिक कारणामुळे मालिकेत परत येऊ शकली नाही तर आमच्याकडे दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्याशिवाय पर्याय नाहीये. आम्ही दिशाला नोटिस पाठवली अशी चर्चा आहे. पण हे चुकीचे आहे, तिला आम्ही कोणतेही अल्टिमेटम दिलेले नाहीये. महत्त्वाच्या पात्रांसोबत मालिका पुढे जाणे गरजेची असल्याने तिने आता निर्णय घ्यावा आणि आम्हाला याविषयी कळवावे असे तिला सांगण्यात आले आहे. तसेच मयुर वाकानीबद्दल विचारत असाल तर तो आजही या मालिकेचा भाग आहे.