'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची मालिका. पण काल या मालिकेसंबंधी एक चर्चा मीडियामध्ये पसरल्या ते म्हणजे असित मोदी आणि जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्यातील वाद. काहीच तासांपूर्वी दिलीप यांनी स्वतः या चर्चा अफवा असल्याचं सर्वांना सांगितलं. अशातच मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते मंदार चांदवडकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंदार चांदवडकर?
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मंदार चांदव़डकर यांनी याप्रकरणी त्यांचं म्हणणं स्पष्टपणे मांडलंय. मंदार म्हणतात की, "काय मूर्खपण आहे हा? कोण अशा अफवा पसरवतोय? आम्ही सर्व शांतपणे आणि आनंदाने शूटिंग करतोय." याच मालिकेत जेठालालच्या वडिलांची चंपकचाचांची भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट म्हणतात की, "हे सर्व खोटं आहे. असं काहीही झालेलं नाही."
असित मोदी वादाच्या चर्चांवर दिलीप जोशी काय म्हणाले?
असित मोदींसोबत वादाच्या चर्चा वाढत असतानाच दिलीप जोशी म्हणाले, "ज्या अफवा पसरत आहेत, त्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे. असित भाई आणि माझ्याबद्दल मीडियामध्ये पसरलेल्या गोष्टी या खोट्या आहेत. आणि हे पाहून मला अतोनात दु:ख होत आहे. तारक मेहता का उलटा चष्मा हा शो माझ्यासाठी आणि चाहत्यांसाठी खूप काही आहे. त्यामुळेच जेव्हा अशा अफवा पसरवल्या जातात तेव्हा फक्त मलाच नाही तर प्रेक्षकांनाही दु:ख होतं."