Join us

"कमी खर्चात, कमी वेळात...", मिलिंद गवळींनी सांगितला 'घात प्रतिघात'चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:56 PM

Milind Gawali : अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर 'घात प्रतिघात' सिनेमाचा किस्सा शेअर केला आहे.

मिलिंद गवळी (Milind Gawali) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. ते सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता अभिनेत्याने सोशल मीडियावर घात प्रतिघात सिनेमाचा किस्सा शेअर केला आहे.

मिलिंद गवळी यांनी घात प्रतिघात सिनेमातील व्हिडीओ आणि फोटो शेअर करत लिहिले की, राजन प्रभू दिग्दर्शित 'घात प्रतिघात' फलटणमध्ये पूर्ण शूट झाला, खासदार हिंदुराव निंबाळकर यांच्या मोठ्या बंगल्यामध्ये याचं चित्रीकरण झालं, राजन प्रभू बरोबरचा हा माझा तिसरा चित्रपट होता, त्यामुळे घात प्रतिघात करत असताना माझी आणि राजनची खूप घट्ट मैत्री झाली होती. जी आजही आहे. त्यामुळे एक मित्र जेव्हा दिग्दर्शक असतो त्या वेळेला काम करण्याची एक वेगळी मजा असते, आपल्याला जे काही करायचं असतं, जे काही सुचत असतं ते मोकळेपणाने आपण दिग्दर्शकांबरोबर चर्चा करून उत्कृष्ट काम करू शकतो, तसंच राजन बरोबर एक वेगळा कंफर्ट माझा होता. राजन हा अतिशय उत्कृष्ट लेखक, ऋषिकेश मुखर्जी यांच्या ८-१० वर्ष सानिध्यात होता. त्यामुळे त्यांच्या लेखणीचा त्यांच्या सिनेमाचा त्याच्यावर खूप मोठा पगडा होता.

सिनेमाचं शूटिंग फलटणमध्ये झालं

तो पुढे म्हणाला की, सध्या हॉरर कॉमेडी सिनेमे भरपूर चालतात, (सध्या "स्त्री" भाग दोन थिएटर मध्ये चालतो आहे), राजननी त्याच पद्धतीचा हॉरर कॉमेडी सिनेमा, त्यात कौटुंबिक पण, असा घात प्रतिघात बनवला, कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये एक उत्कृष्ट सिनेमा, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खेळवून ठेवतो , त्यामध्ये दिग्गज कलाकार त्यांनी घेतले, कुलदीप पवार, विजय चव्हाण,अरुण नलावडे, चेतन दळवी, अलकाताई कुबल , या सिनेमाचं शूटिंग फलटणमध्ये झालं, फलटण हे साताऱ्यापासून जवळ असलेलं फारच छान शहर आहे, हिंदुराव निंबाळकरांसारख्या भारदस्त व्यक्तिमत्व यांचा पाहुणचार, त्यांच्या सुंदर बंगल्यामध्ये बरेच दिवस आम्ही शूटिंग करत होतो, बंगल्याच्या मागच्या बाजूला असंख्य मोर यायचे, हिंदुराव त्यांच्यासाठी खाद्य आणायचे, ते रोज सकाळी त्या मोरांना खायला द्यायचे, मागे छानशी नदी, निसर्गरम्य वातावरण, पण सिनेमा मात्र भीतीदायक, कथा अशी होती की कुलदीप पवार मला त्याच्या स्वार्थासाठी हात तोडून रेल्वे रुळावर फेकून देतो, रेल्वे खाली येऊन मरून गेला असं सगळ्या गावाला कळतं, पण नंतर मी भूत बनवून सगळ्यांना छळायला सुरुवात करतो, मग काय भूत बघितल्यानंतर विजय चव्हाण, चेतन दळवी, कुलदीप पवार यांची तुफान कॉमेडी, मग शेवटी असं लक्षात येतं कीमी मेलेला नसतो, सापडलेले प्रेत एका दारुड्याचं होतं, आणि अरुण नलावडे हे मला मदत करतात सूड घेण्यासाठी, आणि शेवटी मी परत गावात येऊन सुखी संसार करतो, आनंदी शेवट. 

माझे हे असे सिनेमे यात्रांमध्ये खूप चालायचे, लोकांना ते आवडायचे सुद्धा, ते हसत हसत आनंदी होऊन थिएटरच्या बाहेर पडायचे, म्हणायचे पैसा वसूल फिल्म, या सिनेमाचा प्रीमियर फलटण मध्येच झाला होता, आणि माझ्या वडिलांसोबत मी त्या प्रीमियर ला गेलो होतो, हिंदुराव निंबाळकर सुद्धा त्या प्रीमियरला होते, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले.

टॅग्स :मिलिंद गवळी